एक दिलाने, एक विचाराने संघटनाच्या ताकदीवर पिंपरी महापालिकेत कमळ फुलविणार
भाजप कार्यकर्त्यांचा ‘100 पार’चा निर्धार
पिंपळे गुरव येथे आमदार शंकर जगताप प्रतिष्ठानची महत्त्वपूर्ण बैठक
पिंपरी-चिंचवड:पिंपरी-चिंचवड शहरात 2017 नंतर भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली असून, ही विकासाची गंगा अविरत सुरू ठेवण्यासाठी आगामी महापालिका निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळवून देण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. एक दिलाने, एक विचाराने आणि संघटनाच्या ताकदीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुन्हा एकदा कमळ फुलविणार, असा ठाम विश्वास पिंपळे गुरव येथे झालेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी (दि. 21) पिंपळे गुरव येथील किनारा बँक्वेट हॉलमध्ये आमदार शंकर जगताप प्रतिष्ठानच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. भाजपचे निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत कार्यकर्त्यांनी ‘100 पार’चा संकल्प पुन्हा एकदा दृढ केला.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार शंकर जगताप यांनी सांगितले की, भाजपच्या माध्यमातून 2017 पासून पिंपरी-चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास झाला आहे. पाणी व्यवस्थापन, रस्त्यांचे जाळे, मेट्रोचे विस्तारीकरण, आरोग्य सेवांचे विकेंद्रीकरण आणि शिक्षणाचा दर्जा उंचावणे अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामे झाली आहेत. ही सर्व विकासकामे नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे, असे त्यांनी सांगितले.
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विकासात्मक आणि प्रगतशील धोरणांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहनही आमदार जगताप यांनी केले.
भारतीय जनता पक्षाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आमदार शंकर जगताप यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार असून, बूथ स्तरापासून मंडल आणि शक्ती केंद्र प्रमुखांपर्यंत सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. बैठकीत मायक्रो प्लॅनिंगद्वारे निवडणूक लढविण्याची रणनीती ठरविण्यात आली असून, प्रत्येक प्रभागात काटेकोर नियोजन करून काम करण्याचा निर्धार करण्यात आला.
कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले की, भाजपच्या माध्यमातून पिंपरी-चिंचवड शहराचा चेहरामोहरा बदलला असून, आयटी सिटीपासून मेट्रोपॉलिटन सिटीकडे शहराची वाटचाल सुरू आहे. हा विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी शहरात सक्षम आणि धोरणात्मक नेतृत्व गरजेचे आहे. ‘100 पार’चे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता जबाबदारीने काम करेल, असा निर्धारही यावेळी करण्यात आला.
संघटनात्मक ताकद, शिस्तबद्ध नियोजन आणि जनतेशी थेट संवाद या त्रिसूत्रीवर काम केल्यास आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजप मोठ्या विजयाकडे वाटचाल करेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
