आळंदी : कार्तिकी वैद्य द्वादशी, रविवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी पहाटे पवमान अभिषेक, दुधारती व पंचोपचार पूजा विधीपूर्वक संपन्न झाले. नांदेडकर मंडळींची दिंडी क्र. १५ यांनी पहाटे ३ ते ६ या वेळेत मुक्ताई मंडपात काकडा भजन सादर केले. सकाळी ५ ते ११:३० या वेळेत भाविकांनी चल पदुकांवर पूजा करून दर्शन घेतले. दुपारी १२ ते १२:३० श्रींचा महानैवेद्य संपन्न झाला.
सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या रथोत्सवाला “माऊली माऊली” च्या जयघोषात, हरिनामाच्या गजरात व भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली. टाळ-मृदंगाच्या निनादाने आणि जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात रंगला. श्री नृसिंह सरस्वती मठ मंदिर येथे माऊलींच्या रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. तेथील मान्यवरांनी श्रींची पूजा करून रथोत्सवाचे शुभेच्छा दिल्या. मार्गातील विविध ठिकाणी भाविकांनी पुष्पहार अर्पण करून श्रींचे स्वागत केले तसेच फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.
या वेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे, विश्वस्त रोहिणी ताई पवार, विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, तसेच ग्रामस्थ व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दुपारी ४ ते ६ या वेळेत ह.भ.प. माधव बडवे यांचे वीणा मंडपात कीर्तन पार पडले. रात्री ८:३० ते ९ या वेळेत श्रींची धुपारती झाली. त्यानंतर रात्री ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. केंदुरकर महाराज यांचे वीणा मंडपात कीर्तन होणार आहे.
https://youtube.com/watch?v=kmdwat_-zwY&si=oA5-hOoblmF4AnYw
