पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत अनेक दिग्गज, अनुभवी माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. प्रभागात अपेक्षित विकासकामे न झाल्याचा आरोप, निवडणुकीपुरते दर्शन देण्याची राजकीय पद्धत आणि ऐनवेळी झालेली पक्षांतरे यामुळे मतदारांनी अनेक नेत्यांना थेट नाकारल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. काही प्रभागांमध्ये अटीतटीच्या लढती झाल्या असून, अनेक माजी नगरसेवकांचा निसटता पराभव झाला आहे.
9 वर्षांनंतरची निवडणूक; नव्या पिढीचा उदय
महापालिकेची निवडणूक तब्बल 9 वर्षांनंतर झाल्याने शहरातील राजकीय चित्रात मोठा बदल झाला आहे. या कालावधीत नव्या पिढीचे मतदार मोठ्या प्रमाणावर मतदान प्रक्रियेत सहभागी झाले. त्याचबरोबर उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा निर्माण झाली. निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात पक्षांतरे झाल्याने अनेक प्रभागांमध्ये लढती अत्यंत चुरशीच्या ठरल्या. या स्पर्धेत अनेक माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
भाजपला बहुमत; तरीही अनेक दिग्गजांना पराभव
भाजपला महापालिकेत बहुमत मिळाले असले, तरी पक्षातील अनेक अनुभवी माजी पदाधिकाऱ्यांना मतदारांनी नाकारले आहे.
भाजपकडून पराभूत झालेले प्रमुख माजी पदाधिकारी व नगरसेवक पुढीलप्रमाणे:
माजी महापौर उषा डोरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, विलास मडिगेरी, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते, सिद्धेश्वर बारणे, जालिंदर शिंदे, सुरेश म्हेत्रे, सद्गुरू कदम, शांताराम पालेकर, प्रसाद शेट्टी, स्वीकृत माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे.तसेच भाजपच्या माजी नगरसेविका जयश्री गावडे, पालांडे, सुजाता उषा, अनुराधा गोफणे, मीनल यादव, उषा मुंढे यांनाही पराभव पत्करावा लागला.भाजप–आरपीआय आघाडीच्या माजी नगरसेविका चंद्रकांता सोनकांबळे यांचाही पराभव झाला आहे.भाजपचे एकूण 22 माजी नगरसेवक पराभूत झाले असून, त्यामध्ये बंडखोर उमेदवार राजेंद्र गावडे व शारदा सोनवणे यांचाही समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसलाही मोठा फटका
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून, पक्षाचे 22 माजी नगरसेवक पराभूत झाले आहेत.राष्ट्रवादीचे माजी स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे, माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर, तसेच माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, मयूर कलाटे, रोहित काटे, वसंत बोराटे, लक्ष्मण सस्ते, काळूराम पवार, राजेंद्र जगताप, राजू लोखंडे, धनंजय काळभोर, नारायण बहिरवाडे, तानाजी खाडे, सचिन भोसले यांचा पराभव झाला आहे.यामध्ये स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, माजी नगरसेविका शीतल काटे, अश्विनी जाधव, प्रियांका बारसे, उषा काळे, रेखा दर्शले, अश्विनी चिंचवडे तसेच बंडखोर माजी नगरसेविका प्रज्ञा खानोलकर यांचाही समावेश आहे.राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष व माजी नगरसेवक तुषार कामठे आणि माजी नगरसेविका सुलक्षणा धर यांनाही पराभव स्वीकारावा लागला आहे.
मनसे आणि शिवसेनेलाही फटका
मनसेकडून शहराध्यक्ष व माजी नगरसेवक सचिन चिखले, त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका अश्विनी चिखले, तसेच माजी नगरसेवक शशिकिरण गवळी हे पराभूत झाले आहे शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ तसेच माजी नगरसेविका वैशाली जवळकर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला आहे.
मतदारांचा स्पष्ट संदेश
या निकालातून मतदारांनी कामगिरी, सातत्यपूर्ण संपर्क आणि विश्वासार्हतेला प्राधान्य दिल्याचा स्पष्ट संदेश दिला आहे. केवळ पदाचा अनुभव किंवा राजकीय ओळख पुरेशी ठरत नसून, प्रभागातील प्रत्यक्ष काम आणि जनतेशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क निर्णायक ठरत असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
