राज्य निवडणूक आयोगाने १५ डिसेंबर २०२५ रोजी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा केल्यानंतर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर आचारसंहितेचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू करण्यात आली आहे. आज (१६ डिसेंबर) दुपारी ३ वाजेपर्यंत शहरात नियमबाह्य व अनधिकृतपणे लावण्यात आलेले ४ हजार ८१९ राजकीय फ्लेक्स, बॅनर्स, किऑस्क, स्टिकर्स, होर्डिंग, चिन्हे, ध्वज, फलक तसेच भिंतीवरील राजकीय जाहिराती हटविण्यात आल्या (Municipal Election) आहेत.
महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात येत असून, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना व आदेशांचे पालन करण्यासाठी महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील प्रमुख चौक, मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे तसेच शासकीय इमारतींच्या परिसरात लावलेले अनधिकृत व नियमबाह्य जाहिरात फलक आणि फ्लेक्स हटविण्याची मोहीम युद्धपातळीवर राबविण्यात (Municipal Election) येत आहे.
ही कारवाई करताना संबंधित राजकीय पक्ष, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महापालिकेला सहकार्य करावे, तसेच पुढील काळात कोणत्याही स्वरूपात आचारसंहितेचा भंग होईल असे साहित्य लावू नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले (Municipal Election) आहे.
निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता व समतोल राखण्यासाठी आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी अत्यंत महत्त्वाची आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रभाव टाळण्यासाठी प्रशासनाने वेळेत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या असून, सर्वांनी नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे, असे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी (Municipal Election) सांगितले.
दरम्यान, निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरात कुठेही राजकीय स्वरूपाचे जाहिरात फलक, होर्डिंग किंवा फ्लेक्स राहू नयेत यासाठी ही कारवाई सुरू असून, आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेऊन पुढील काळातही ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचे उपायुक्त राजेश आगळे यांनी (Municipal Election) स्पष्ट केले.
