पिंपरी प्रतिनिधी – सार्वजनिक ठिकाणी थुंकणे किंवा कचरा टाकण्याचे प्रकार आता नागरिकांना चांगलेच महागात पडत आहेत. प्रभाग क्रमांक 27 अंतर्गत येणाऱ्या रहाटणी परिसरात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाने विशेष स्वच्छता मोहीम राबवून मोठी दंडात्मक कारवाई केली. गेल्या पंधरा दिवसांत नियमभंग करणाऱ्या 228 नागरिकांकडून तब्बल 1 लाख 27 हजार 200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
आरोग्य विभागाच्या पथकाने रहाटणी-श्रीनगर परिसरासह तापकीर चौक, नखाते चौक, रहाटणी फाटा, काळेवाडी फाटा आणि तांबे रोड या भागात तपासणी केली. या मोहिमेदरम्यान सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली.
दंडाची माहिती पुढीलप्रमाणे:
1. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्याप्रकरणी 217 नागरिकांकडून एकूण 91,200 रुपये दंड
2. बंदी असलेले प्लास्टिक वापरल्याबद्दल दोन जणांवर 5,000 रुपये प्रत्येकी प्रमाणे 10,000 रुपये दंड
3. डासउत्पत्ती स्थान निर्माण केल्याबद्दल सोसायटी/हॉटेल/मॉल यांच्याकडून 10,000 रुपये दंड
4. मोकळ्या जागेत कचरा टाकल्याबद्दल चार प्रकरणांत 2,000 रुपये प्रत्येकी प्रमाणे 8,000 रुपये दंड
5. सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळल्याबद्दल 5,000 रुपये दंड
6. सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल तीन जणांना प्रत्येकी 1,000 रुपये प्रमाणे 3,000 रुपये दंड
ही कारवाई ‘ग’ प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे आणि सहाय्यक आरोग्य अधिकारी कुंडलिक दरवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आरोग्य निरीक्षक आणि कर्मचारी – गणेश राजगे, आबा कदम, अरुण राऊत, प्रदीप जगताप, किरण त्रिभुवन, गणेश कार्ले, विशाल यादव, धोंडीबा भालेराव, सागर जाधव, पांडुरंग साठे, अमरदीप जगताप, श्रीकांत कांबळे, संतोष शेरखाने, भारत गायकवाड तसेच डिवाईन स्टाफमधील यश लोंढे यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
महापालिकेच्या या कारवाईनंतर परिसरात स्वच्छता आणि सार्वजनिक नियमांचे पालन याबाबत जनजागृती वाढू लागल्याचे स्पष्ट होत आहे.
