पुणे | प्रतिनिधी:नात्यातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत चुलत भावाचा खून करून त्याचा मृतदेह डोंगरात टाकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका व्यक्तीस अटक केली आहे.
अशोक पंडित (वय 35, रा.+ मोशी, मूळ रा. झारखंड) असे अटक झालेल्या व्यक्तीचे नाव असून, अजय पंडित (वय 23, रा. खोपडेनगर, कात्रज, मूळ रा. झारखंड) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय आणि अशोक हे चुलत भाऊ असून दोघेही मागील चार वर्षांपासून पुण्यात मजुरीचे काम करीत होते. अजय हा कात्रज येथील एका बांधकाम प्रकल्पाच्या परिसरात राहत होता, तर अशोक मोशी येथे वास्तव्यास होता. काही दिवसांपूर्वी अजय अचानक बेपत्ता झाल्याची तक्रार भारती विद्यापीठ पोलिसांकडे नोंदविण्यात आली होती.
बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यात संशयाची दिशा स्पष्ट होताच अशोकला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला त्याने चौकशी चुकवण्याचा प्रयत्न केला, मात्र नंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने चुलत भाऊ अजयचा खून केल्याची कबुली दिली. गुन्ह्यानंतर अजयचा मृतदेह कात्रजमधील गुजरवाडी परिसरातील डोंगराळ भागात टाकल्याचेही त्याने सांगितले.
पोलिसांनी दाखविलेल्या ठिकाणाहून मृतदेह ताब्यात घेत ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, उपनिरीक्षक नीलेश मोकाशी व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
