यमुनानगर, निगडी :भारतीय दलित साहित्य अकादमी, दिल्ली यांच्या वतीने साहित्यिक, कवी व लेखक डॉ. जयद्रथ आत्माराम आखाडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक फेलोशिप राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
भारतीय दलित साहित्य अकादमी, दिल्ली यांनी महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांतील मान्यवर कवी, कवयित्री, लेखक, पत्रकार, कलाकार व नाटककारांची विविध पुरस्कारांसाठी निवड केली होती. त्यानुसार १२ व १३ डिसेंबर २०२५ रोजी दिल्ली येथील झडोंदा गावातील पंचशील भवन येथे आयोजित भव्य समारंभात पुणे जिल्ह्यातील कवीवर्य डॉ. जयद्रथ आत्माराम आखाडे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय फेलोशिप अवार्ड – २०२५ प्रदान करण्यात आला.
हा पुरस्कार भारतीय दलित साहित्य अकादमी, दिल्ली संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. प्रा. डॉ. एस. पी. सुमनाक्षर यांच्या शुभहस्ते, तसेच आयु. संघ प्रिय गौतम (माजी केंद्रीय मंत्री व प्रमुख संस्थापक अध्यक्ष) यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
डॉ. जयद्रथ आखाडे यांच्या या राष्ट्रीय सन्मानाबद्दल पिंपरी-चिंचवड परिसरासह विविध साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे. त्यांच्या साहित्यिक योगदानाची ही योग्य पावती असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
