प्रतिनिधी:केंद्र सरकारने शुक्रवारपासून लागू केलेल्या ४ नवीन कामगार संहितांमुळे देशातील श्रमव्यवस्थेत मोठा बदल होणार आहे. यामध्ये वेतन संहिता 2019, सामाजिक सुरक्षा संहिता 2020, औद्योगिक संबंध संहिता 2020 आणि व्यावसायिक सुरक्षितता, आरोग्य व कामकाज स्थिती संहिता 2020 यांचा समावेश आहे.
या निर्णयामुळे देशातील सुमारे ५० कोटी कामगारांना थेट लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. नवीन संहितेनुसार ठराविक कामकाजाच्या वेळेपेक्षा जास्त तास काम झाल्यास कामगारांना दुप्पट वेतन देणे कायदेशीर बंधनकारक असेल. यामुळे उद्योगांतील अनियमितता कमी होऊन कामगारांना योग्य मोबदला मिळण्याची शक्यता आहे.
देशभरातील प्रत्येक प्रदेशासाठी वेतन संरचना स्पष्ट केली जाणार असून सर्वांना किमान वेतन देणे अनिवार्य असेल. या तरतुदीमुळे कंत्राटी, असंघटित आणि खाजगी क्षेत्रातील लाखो कामगारांना दिलासा मिळू शकतो.
महिलांना आवश्यक सुरक्षा आणि सुविधा उपलब्ध असल्यास उद्योगांना महिलांना रात्रीच्या शिफ्टमध्ये काम देण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे महिलांच्या रोजगाराच्या संधी वाढतील.
पहिल्यांदाच गिग वर्कर्स, डिलिव्हरी पार्टनर्स आणि ॲप-आधारित कामगारांना सामाजिक सुरक्षा कवच देणारी तरतूद करण्यात आली आहे. यात अपघात विमा, आरोग्य विमा आणि निवृत्तीविषयक लाभांचा समावेश असू शकतो.
नवीन कायद्यांनुसार उद्योग, कारखाने आणि बांधकाम क्षेत्रात सुरक्षा मानके अधिक कडक करण्यात आली आहेत. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अपघातांसंदर्भात जबाबदारी निश्चित करण्यासाठी समित्या स्थापन करण्याची तरतूद आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की,
“कामगार सुधारणा हे श्रमिक आणि उद्योग दोघांच्या विकासासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. या संहितेमुळे देशातील कामगार अधिक सशक्त आणि सुरक्षित होतील.”
४ नवीन कामगार संहिता:
-
Social Security Code, 2020 – EPFO, ESIC, गिग कामगार संरक्षण
-
Wage Code, 2019 – वेतन, बोनस, ओव्हरटाईम
-
Industrial Relations Code, 2020 – नोकरी करार, संघर्ष निवारण
-
Occupational Safety, Health & Working Conditions Code, 2020 – सुरक्षित कामकाज वातावरण
