तारांगण, सायन्स पार्क, चिंचवड (दि. ९ फेब्रुवारी) : स्वानंद महिला संस्था, पिंपरी–चिंचवड यांच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त “पुरुषांनाही मेनोपॉज असतो का…?” या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या वेळी डॉ. वैशाली लोढा यांनी मार्गदर्शन करताना टेस्टेस्टेरॉन संप्रेरकाच्या कमतरतेमुळे पुरुषांमध्ये शारीरिक, मानसिक व लैंगिक बदल होतात, असे सांगितले. वाढते वय, ताणतणाव, लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब, थायरॉईड, धूम्रपान, मद्यसेवन, झोपेची अनियमितता व व्यायामाचा अभाव ही त्यामागील प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. योग्य निदान, उपचार, संवाद, संतुलित आहार व नियमित व्यायाम यामुळे समतोल व आनंदी जीवन शक्य असल्याचे त्यांनी नमूद केले. पत्नीची समजूतदार साथही पुरुषांच्या आरोग्यासाठी महत्त्वाची असल्याचे त्यांनी (Swanand Mahila sanstha) सांगितले.
या परिसंवादाच्या अध्यक्षपदी डॉ. वैशाली लोढा होत्या. सायन्स पार्कच्या अधिकारी अस्मिता ताई सावंत व ज्येष्ठ बास्केटबॉलपटू अश्विनी वर्टी मंचावर उपस्थित होते. सहभागी म्हणून राजश्री बिनायकिया, लीना कटारिया, शकुंतला ओस्तवाल, जयश्री बाफना आणि लता बाविस्कर उपस्थित होत्या. परिसंवादाचे सूत्रसंचालन सौ. सीमा गांधी (ज्येष्ठ साहित्यिका) यांनी केले.
कार्यक्रमानंतर सर्व महिलांना सायन्स पार्कची सहल घडविण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन शोभा बंब (अध्यक्ष), प्रा. सुरेखा कटारिया (संस्थापिका), सीमा गांधी (सचिव) आणि कांचनमाला बाफना (माजी अध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
