पिंपरी, ता. ३१ – केंद्र सरकारच्या आगामी आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात उद्योजकांच्या विविध मागण्यांचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी पिंपरी-चिंचवड शहरातील फेडरेशन ऑफ एम.एस.एम.ई. उद्योजक संघटनेने केली (MSME Demands )आहे.
याबाबत संघटनेचे अध्यक्ष डॉ. गोविंद पानसरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज वितरण प्रक्रिया अधिक सुलभ करावी. लघुउद्योगांच्या संरक्षणासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रक्रिया सोपी करण्यात यावी. अमेरिकेच्या वाढीव आयात शुल्कामुळे प्रभावित झालेल्या उद्योगांसाठी विशेष प्रोत्साहनपर योजना (MSME Demands )राबवाव्यात.

तसेच, विनातारण व विनाजामीन कर्जपुरवठ्याची मर्यादा सध्याच्या पाच कोटी रुपयांवरून दहा कोटी रुपयांपर्यंत वाढवावी. निर्यात प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी डिजिटल प्रणालीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करावा. जागतिक बाजारपेठेत उद्योगांना स्पर्धात्मक टिकवून ठेवण्यासाठी विपणनासाठी आर्थिक व तांत्रिक मदत उपलब्ध करून द्यावी, अशा मागण्या केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात समाविष्ट कराव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले (MSME Demands )आहे.
