प्रतिनिधी:पिंपरी-चिंचवड वैभव काव्यसंग्रहातून शहराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक प्रतिभेची माहिती व ओळख सर्वांना होते. या काव्यसंग्रहाने शहराविषयी शब्दांचे कोंदण तयार केले आहे. स्थानिक साहित्यिकांशी योग्य समन्वय साधून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले; ही विशेष कौतुकास्पद बाब आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा आणि मराठी भाषा संवर्धन समिती पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने संभाजी बारणे यांच्या संकल्पनेतून, तसेच राजन लाखे संपादित पिंपरी-चिंचवड वैभव या काव्यसंग्रहाचे प्रकाशन बुधवारी (दि. ३ डिसेंबर) वर्षा उसगांवकर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, डॉ. अभय कुलकर्णी, अशोक पगारिया, माजी नगरसेविका मनिषा पवार, महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखा अध्यक्ष राजन लाखे, संभाजी बारणे, कांचन जावळे, प्रभाकर ओव्हाळ, सागर बारणे, विशाल बारणे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. श्रीपाद जोशी म्हणाले की, सध्या संस्कृतीची साठवणूक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भौतिक साधनांद्वारे संस्कृतीचे जतन होत नाही; त्यासाठी गावागावातील लोककला, साहित्य, काव्य, कलावंत, शास्त्रज्ञ, राजकारणी, कामगार—ही सामाजिक वीण अत्यंत महत्त्वाची आहे. हीच संस्कृतीची खरी श्रीमंती. बारणे आणि लाखे यांनी या काव्यसंग्रहातून पिंपरी-चिंचवड शहराच्या सांस्कृतिक ऐश्वर्याचे दर्शन घडवले, असेही त्यांनी नमूद केले.
भाऊसाहेब भोईर म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराचा नावलौकिक साहित्य, क्रीडा, शिक्षण, समाजकारण आणि राजकारण अशा सर्वच क्षेत्रांत वाढला पाहिजे. शहरात प्रतिभावंतांची नवी पिढी घडत आहे. अनेक कलाकारांनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविला आहे. बारणे आणि लाखे यांनी सादर केलेला हा काव्यसंग्रह नवोदित साहित्यिकांसाठी प्रेरणादायी ठरेल.
या काव्यसंग्रहासाठी शहरातील कवींकडून स्वलिखित कविता मागविण्यात आल्या होत्या. एकूण १५२ कविता प्राप्त झाल्या, त्यापैकी ९६ कवितांचा समावेश करण्यात आल्याचे राजन लाखे यांनी सांगितले.
कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरूपात कवयित्री सुरेखा कटारिया, अकीला इनामदार, कमल सोनजे, मंगला पाटसकर, प्रा. सुभाष आहेर, डॉ. निळकंठ मालाडकर, सिताराम नलगे, रमेश पिंजरकर यांचा सत्कार करण्यात आला. फिरोज मुजावर यांनी नृत्याविष्कारातून गणेश स्तुती सादर केली. ऋचा राजन यांनी गणेश वंदना सादर केली. सूत्रसंचालन गणेश लिंगाडे यांनी, तर आभार प्रदर्शन संभाजी बारणे यांनी केले. कार्यक्रमास साहित्यिक, कवी आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
