पोट धरून हसलेले अजितदादा
पत्रकार म्हणून मी पिंपरी-चिंचवडमध्ये वार्तांकनाला सुरुवात केली, तेव्हा वय तरुण होतं आणि भूमिका प्रस्थापितांविरोधात ठाम होती. त्या काळात अजित पवार यांच्या काही निर्णयांवर मी परखड, कधी कधी कडवट टीकाही केली. मात्र त्या टीकेबद्दल अजितदादांनी कधीही मला जाब विचारला नाही, कधी नाराजी व्यक्त केली नाही. त्यांची भूमिका कायम एकसारखी (Ajit Pawar Memories )असायची —
“तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करतो.”
उलट एखादा वेगळा, धारदार लेख लिहिला, तर समोरासमोर भेटीत ते आवर्जून त्याचं कौतुक करायचे. टीका सहन करण्याची आणि विचारांची दखल घेण्याची हीच त्यांच्या मोठेपणाची खूण होती.
मोरे आणि अजित पवार यांच्यातील दिलजमाईवर मी “तुझ्या गळा, माझ्या गळा” या शीर्षकाचा लेख लिहिला होता. नेमक्या त्याच दिवशी अजितदादा महापालिकेत आले होते. लेख वाचून त्यांनी मिश्किल टिप्पणी करत दाद दिली. त्यानंतर “सत्तासुंदरीचं स्वयंवर” हा लेखही तितकाच गाजला. सत्ता-सुंदरीला वश करण्यासाठी अजितदादा आणि रामकृष्ण मोरे यांच्यात रंगलेली काल्पनिक स्पर्धा, गमतीदार शैलीत मांडली होती. तो लेख वाचून अजितदादा पोट धरून हसले होते. त्या हसण्यात राग नव्हता, तर विचारांची आणि कल्पनाशक्तीची दाद (Ajit Pawar Memories) होती.
लोकसत्ताची नोकरी सोडून आम्ही एमपीसी न्यूज — पुणे शहरातील पहिलं सिटी न्यूज पोर्टल — सुरू केलं. त्याची सुरुवात २२ जुलैला, अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच केली. शुभारंभानिमित्त ग्लेझ पेपरवर विशेषांक काढला. चिंचवडच्या रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात एका कार्यक्रमात अजितदादांची भेट झाली. तो विशेषांक त्यांना दिला. त्यांनी तो पूर्ण बारकाईने चाळला, न्यूज पोर्टलची संकल्पना समजून घेतली, मीडिया हाऊसचं अर्थकारण जाणून घेतलं आणि
“आमच्या महापौरांची, आमदारांची जाहिरात का नाही?”
असा सवाल करत चिमटाही काढला. एवढा मोठा नेता इतके बारकावे टिपतो, याचं त्या क्षणी मनापासून कौतुक( Ajit Pawar Memories)वाटलं.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या धामधुमीत त्यांची धावती भेट झाली. नवीन चॅनल सुरू केल्याचं सांगितलं.
“स्टुडिओला या, छान पॉडकास्ट करू,”
असं आमंत्रण दिलं. ते हसत म्हणाले,
“निवडणूक झाल्यावर निवांत येतो.”
पण आता…
दादा गेले.
कायमचे!
आणि त्यांच्या त्या पोट धरून हसलेल्या आठवणीच आज(Ajit Pawar Memories )उरल्या आहेत…
विवेक इनामदार
लेखक पिंपरी चिंचवड येथील जेष्ठ पत्रकार, my pcmc global या पोर्टलचे मुख्य संपादक आहेत
