प्रतिनिधी:औद्योगिकनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी तीव्र होत आहे. त्यामुळे शहरात मेट्रोचे जाळे विस्तारण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासाठी किवळे – रावेत – डांगे चौक – काळेवाडी – जगताप डेअरी ते चतुर्शृंगी असा नवीन मेट्रो मार्ग तयार करून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करावा, अशी मागणी शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे (Pcmc Metro Expansion) केली आहे.
खासदार श्रीरंग बारणे यांनी दिल्लीत केंद्रीय शहरी विकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेतली. पिंपरी-चिंचवड शहरात नवीन मेट्रो मार्गाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले आणि त्याबाबतचे सविस्तर निवेदनही दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे की पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र हे देशातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरी भागांपैकी एक आहे. जलद शहरीकरणामुळे लोकसंख्या आणि वाहनांमध्ये मोठी वाढ झाली असून त्यातून गंभीर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. परिणामी वाहतूक (Pcmc Metro Expansion) व्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाची घोषणा केली असून सध्या विविध मार्गांवर मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. काही मार्गांवर मेट्रो धावती झाली आहे. त्यामुळे नागरिकांना सुलभ, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वाहतूक सुविधा उपलब्ध होत आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये दापोडी ते पिंपरी या मार्गावर मेट्रो सुरु आहे. तसेच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार निगडी ते भक्ती शक्ती चौकापर्यंत मेट्रो विस्ताराचे काम सुरू झाले आहे. हे शहरासाठी महत्त्वाचे पाऊल असून निगडीतून थेट पुण्यापर्यंत मेट्रोने प्रवास करणे शक्य (Pcmc Metro Expansion)होणार आहे.
पिंपरी-चिंचवडमधील वेगाने वाढणारी लोकसंख्या, वाढती वाहतूक कोंडी आणि भविष्यातील गरजा लक्षात घेता किवळे – रावेत – डांगे चौक – काळेवाडी – जगताप डेअरी ते चतुर्शृंगी या मेट्रो मार्गाचा विस्तार करणे अत्यावश्यक आहे. हा संपूर्ण परिसर औद्योगिक, शैक्षणिक आणि निवासीदृष्ट्या महत्त्वाचा असल्याने मेट्रो सेवेमुळे या भागाचा सर्वांगीण (Pcmc Metro Expansion) विकास वेगाने होईल.
या मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यासाठी आवश्यक प्रशासकीय आणि तांत्रिक कार्यवाही तातडीने सुरू करावी. हा मार्ग कार्यान्वित झाल्यास पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील वाढत्या वाहतूक समस्यांवर दीर्घकालीन आणि शाश्वत उपाय उपलब्ध होईल. त्यामुळे या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी खासदार बारणे (Pcmc Metro Expansion) यांनी केली.
