प्रतिनिधी:भारतीय टपाल खात्याने नुकतेच ‘डाक सेवा २.०’ हे नवीन मोबाइल अॅप लॉन्च केले असून, यामुळे पोस्टाच्या विविध सेवांचा लाभ घेणे अधिक सुलभ झाले आहे. या अॅपमुळे प्रत्यक्ष टपाल कार्यालयात जाण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. १३ नोव्हेंबरपासून हे अॅप ग्राहकांसाठी उपलब्ध झाले असल्याची माहिती टपाल विभागाने दिली असून, नागरिकांनी या ऑनलाईन सेवेचा लाभ Dak Seva-2-0घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
या महिन्यातच भारतीय डाक विभागाने हे अॅप ग्राहकांना घरबसल्या टपाल सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू केले आहे. ‘डाक सेवा २.०’ हे इंडिया पोस्टच्या IT 2.0 उपक्रमाचा महत्त्वाचा टप्पा मानले जात आहे. या अॅपद्वारे जवळपास सर्वच पोस्टल सेवा ऑनलाईन मिळू शकतील.
अॅपमधील प्रमुख सुविधा:
-
पार्सल ट्रॅकिंग – पाठविलेल्या पार्सल किंवा स्पीड पोस्टची स्थिती त्वरित पाहता येईल.
-
मनी ऑर्डर सेवा – प्रत्यक्ष पोस्टात न जाता मोबाईलवरूनच मनी ऑर्डर पाठवता येईल.
-
स्पीड पोस्ट फी कॅल्क्युलेटर – विविध सेवांसाठी लागणारे शुल्क सहज तपासता येईल.
-
पोस्टल लाईफ इन्शुरन्स (PLI/RPLI) – विमा हप्ते ऑनलाईन सहज भरता येतील.
-
तक्रार नोंदणी आणि स्टेटस – तक्रार नोंदवणे व त्यावरील कार्यवाहीची स्थिती तपासता येईल.
-
पोस्ट सेव्हिंग अकाऊंट – पोस्ट ऑफिस बचत खात्याशी संबंधित माहिती व व्यवहार पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.
“डाक सेवा २.० हे आधुनिक, वेगवान आणि पारदर्शक सेवांचे व्यासपीठ आहे. हे अॅप मोबाईलवर सहज डाउनलोड करता येते. या ऑनलाईन सेवेमुळे नागरिकांना ते जिथे आहेत तिथूनच सुरक्षित आणि जलद पोस्टल सेवा मिळतील,” असे पिंपरी पोस्टचे जनसंपर्क अधिकारी काळुराम पारखी यांनी सांगितले.
