प्रतिनिधी:निगडी–आकुर्डी प्राधिकरणातील नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा निषेध करत बुधवारी (दि. ३ डिसेंबर) संध्याकाळी हुतात्मा चौक, आनंद हॉस्पिटलजवळ जोरदार आंदोलन करून रास्ता रोको केला. पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने या परिसरात सुरू असलेल्या हरित सेतू प्रकल्पामुळे अनेक वर्षे वाढलेले देशी वृक्ष तोडले जाणार असून पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण होणार आहे. तसेच मुख्य रस्ते अरुंद करून पदपथ मोठे करण्यात आल्यास वाहतूक कोंडी वाढेल, दररोज होणाऱ्या वर्दळीमुळे अपघातांची शक्यता अधिक वाढेल, असा नागरिकांचा आक्षेप (Green Setu Project Opposition)आहे.
निगडी प्राधिकरण रेसिडेंट फोरम फाउंडेशन (NPRF) यांच्या पुढाकाराने झालेल्या या आंदोलनात परिसरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने सहभाग घेतला. काळे झेंडे, काळ्या फिती, हातात निषेधफलक आणि घोषणा देत प्रशासनाच्या कारभाराचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. आंदोलनानंतर नागरिकांच्या सह्यांची मोहीम राबविण्यात आली असून शेकडो नागरिकांनी या प्रकल्पाविरोधात (Green Setu Project Opposition) सह्या केल्या.
स्थानिक नागरिकांची हरित सेतू प्रकल्पाची कोणतीही मागणी नसतानाही कोट्यवधी रुपयांचा हा खर्चिक आणि अनावश्यक प्रकल्प मनपा प्रशासनाने सुरू केला आहे. परिसराची रचना, वाहतुकीची सद्यस्थिती आणि नागरिकांच्या गरजा पूर्णपणे दुर्लक्षित करून जबरदस्तीने प्रकल्प राबवला जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला. यामुळे मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडी आणखी गंभीर होईल, अपघातात वाढ होईल, असे नागरिकांनी वारंवार निवेदनांमधून सांगितले. तरीही मनपाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला (Green Setu Project Opposition) नाही.
या भागातून रावेत, पुनावळे आणि द्रुतगती महामार्गाकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि कामगारांची दिवसभर मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत हरित सेतू प्रकल्प नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणारा असल्याने तो कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही (Green Setu Project Opposition) देण्यात आला.
या आंदोलनाचे नियोजन संस्थेचे मार्गदर्शक व माजी महापौर आर. एस. कुमार, समन्वयक निलेश शिंदे, अतुल भोंडवे, अर्जुन दलाल, प्रतिभा जोशी, सूर्यकांत मुथीयान, चंद्रकांत कोठारी, अश्विन खरे, अविनाश मोरे, राजेंद्र बाबर, रवी हिंगे, अमोल निकम, बाळा दानवले, समीर जावळकर, विलास कुटे आणि आकाश शेट्टी यांनी केले. आंदोलनात शैलजा मोरे, अनुप मोरे, शर्मिला बाबर, राजू मिसाळ, अमित गावडे, भारती फरांदे, धनंजय काळभोर, आप्पा बागल, आबा ताकवणे, योगेश बाबर, विजय शिणकर, वैभवी घोडके, श्रीमंत जगताप, बाळा शिंदे, रामभाऊ पांढरकर, अतुल इनामदार तसेच प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आनंदराव मुलुक व सभासद, विविध सामाजिक संघटना, सोसायटी पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते, माजी नगरसेवक-नगरसेविका (Green Setu Project Opposition)मोठ्या संख्येने उपस्थित होते.
