प्रतिनिधी:कासारवाडीतील केशवनगर परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून दोन तरुणांनी मटण विक्रेता आणि त्याच्या मित्रावर चाकू व मद्याच्या बाटलीने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (१६ नोव्हेंबर) रात्री सुमारे साडेदहा वाजता घडली.
या प्रकरणात अल्लमेश उर्फ पापा शब्बीर कुरेशी (२३, खडकी बाजार, पुणे) आणि दिपक सौरभ मिसाळ उर्फ डुन्या (२१) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. जखमी तरुणाचे नाव शाहीद सिराज कुरेशी (२५, केशवनगर, कासारवाडी) असून त्यांनी दापोडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शाहीद आणि त्यांचा चुलत भाऊ अल्लमेश यांच्यात पूर्वीपासून वाद सुरू आहे. रविवारी रात्री शाहीद आणि त्यांचा मित्र ओमकार हे दुचाकीवरून जात असताना दोन्ही आरोपींनी एका हॉटेलच्या मागील बाजूस त्यांना अडवले. संतापाच्या भरात आरोपींनी शाहीद यांना शिवीगाळ करत चाकूने गालावर, कानामागे आणि हातावर वार केले. तसेच ओमकारच्या डोक्यावर आणि तोंडावर बिअरची बाटली फोडत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर उपस्थित नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दापोडी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
