प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवडसारख्या देशातील नामांकित स्मार्ट सिटीमध्ये जरासा पाऊस झाला तरी नागरिकांना सर्वप्रथम कसली भीती वाटत असेल, तर ती म्हणजे वीज जाण्याची! ढग दाटले, दोन सरी कोसळल्या की महावितरणची सेवा अक्षरशः तीन तेरा नऊ बारा झालेली पाहायला मिळते. शहरातील अनेक भागांत तासन्तास वीज गायब होते आणि नागरिक अंधारात, उकाड्यात व मनस्तापात दिवस काढताना (Mahavitaran Power Cut)दिसतात.
स्मार्ट सिटीचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे साध्या पावसातही वीजपुरवठा खंडित होणे, ही खरोखरच शहरासाठी लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल. पिंपरी-चिंचवड हे महाराष्ट्रातील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक. आयटी क्षेत्र, उद्योग, आधुनिक गृहनिर्माण प्रकल्प आणि लाखो करदाते नागरिक असलेल्या या शहरात वीज व्यवस्थेची अशी दयनीय अवस्था असणे म्हणजे प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचे जिवंत उदाहरणच (Mahavitaran Power Cut)आहे.
महावितरणचा भोंगळ कारभार काही नवीन नाही. महिन्याला भरमसाट वीजबिले आकारायची, पण सेवा द्यायची मात्र रामभरोसे, अशीच भावना आता नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. कुठलाही पाऊस असो, वारा असो किंवा एखादा छोटासा तांत्रिक बिघाड — लगेच वीज खंडित करणे हा जणू अधिकाऱ्यांचा सोपा पर्याय बनला आहे. त्यातही ही वीज किती वेळाने येणार, नेमका बिघाड काय आहे, याबाबत नागरिकांना कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात(Mahavitaran Power Cut )नाही.
सर्वाधिक हाल होतात ते ज्येष्ठ नागरिकांचे, लहान मुलांचे आणि घरातून काम करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांचे. वयोवृद्धांना उकाड्यामुळे त्रास सहन करावा लागतो, लहान मुलांचे हाल होतात, तर ऑनलाइन मीटिंग आणि इंटरनेटवर अवलंबून असलेल्या आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे काम अक्षरशः ठप्प होते. अनेकदा अचानक वीज गेल्याने संगणक, टीव्ही, फ्रिजसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणेही धोक्यात येतात. व्होल्टेज फ्लक्चुएशनमुळे उपकरणांचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी मात्र कोणीच घेत (Mahavitaran Power Cut)नाही.
महावितरणच्या हेल्पलाईनवर फोन केला तर समाधानकारक उत्तर मिळेल, अशी अपेक्षाच नागरिकांनी आता सोडून दिली आहे. “काम सुरू आहे”, “थोड्या वेळात वीज येईल”, “लाइन ट्रिप झाली आहे” अशी ठरलेली उत्तरं देऊन वेळ मारून नेण्याचे प्रकार वारंवार घडताना दिसतात. पण प्रत्यक्षात तासन्तास नागरिकांना अंधारात बसावे(Mahavitaran Power Cut) लागते.
आजच्या डिजिटल युगात वीज ही चैनीची गोष्ट नसून मूलभूत गरज बनली आहे. अशा परिस्थितीत स्मार्ट सिटीचा दर्जा मिरवणाऱ्या शहरात वारंवार होणारी वीज कपात ही केवळ गैरसोय नसून प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच महावितरणने यंत्रणा सक्षम करणे अपेक्षित असताना दरवर्षी तीच परिस्थिती निर्माण होते, हे दुर्दैवी (Mahavitaran Power Cut)आहे.
पिंपरी-चिंचवडकर नागरिक वेळेवर कर भरतात, अव्वाच्या सव्वा वीजबिले भरतात; मग त्यांना अखंडित आणि दर्जेदार वीजपुरवठा मिळणे हा त्यांचा अधिकार नाही का? स्मार्ट सिटीच्या नावाखाली फक्त मोठमोठे प्रकल्प उभे करून चालणार नाही, तर मूलभूत सेवाही तितक्याच सक्षम असणे आवश्यक आहे. अन्यथा “स्मार्ट सिटी” हा फक्त फलकावरचा शब्द ठरेल आणि प्रत्यक्षात नागरिकांना मात्र अंधारातच जगावे (Mahavitaran Power Cut)लागेल.
