(विवेक कुलकर्णी) आज दिवसभर पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक निकालांचे वार्तांकन सुरू असताना कार्यालयाच्या आसपास सतत उभे असलेले पोलीस बंधू-भगिनी पाहताना मन अस्वस्थ (Police Stress) झाले.
विजय-पराभवाच्या चर्चा, घोषणांचा गदारोळ, गर्दी आणि उत्साह यामध्ये एक गोष्ट मात्र ठळकपणे जाणवत होती—या संपूर्ण प्रक्रियेचा भार ज्यांच्या खांद्यावर आहे, त्यांच्याकडे पाहण्याची फुरसत कुणालाच नाही.तासन्तास एकाच ठिकाणी उभे राहणे, गर्दी नियंत्रित करणे, कुठलाही अनुचित प्रकार घडू न देण्याची सततची जबाबदारी निभावणे—हे सगळं पोलीसांसाठी रोजचंच आहे. ज्यांचं घर जवळ आहे, त्यांना कदाचित जेवण मिळेलही; पण ज्यांचं घर लांब आहे, ज्यांची ड्युटी ठरलेल्या वेळेपेक्षा कितीतरी जास्त चालते, त्यांच्यासाठी अनेकदा जेवण तर सोडाच, साधा चहाही मिळत (Police Stress)नाही.
वरच्या अधिकाऱ्यांचा धाक,
लोकांच्या अपेक्षांचा दबाव,
राजकीय वातावरणाचा ताण—
या सगळ्याच्या मध्ये उभा असलेला पोलीस माणूस म्हणून कुठेच धरला जात नाही.कुठलाही सण असो, अपघात असो, दंगल असो, निवडणूक असो किंवा आपत्ती—पहिला प्रश्न नेहमी एकच असतो : “पोलीस कुठे आहेत?”मात्र पोलीस समोर आला की त्याच्यावर टीकेचा भडिमार सुरू (Police Stress) होतो.
“हे सगळे भ्रष्ट आहेत”,
“हे सगळे माजलेत”,
“हे सगळे हफ्तेखोर आहेत”—
अशा सार्वत्रिक आरोपांमध्ये संपूर्ण यंत्रणेलाच दोषी ठरवले जाते.
समाजाला सुरक्षा हवी आहे, पण सुरक्षा देणारा माणूस सतत अपमान सहन करणारा असावा, अशीच जणू अपेक्षा आहे.शिस्त हवी आहे, पण शिस्त लावणाऱ्याला शिव्या घालण्याचा अधिकार स्वतःकडे असल्यासारखं वागणं सुरू आहे.पोलीसासाठी रविवार नसतो, सण नसतो, सुट्टी नसते.त्याचं वैयक्तिक आयुष्य अनेकदा समाजाच्या सुरक्षिततेसाठी बाजूला ठेवलेलं(Police Stress) असतं.
पण समाजाला दिसतो तो फक्त एक गणवेश—ज्यावर राग काढता येतो.
या सगळ्याचा सर्वात गंभीर परिणाम पोलीसांच्या मानसिक आरोग्यावर होतो. रोज अपघात, मृत्यू, हिंसाचार, रडणारे नातेवाईक, शिव्या आणि ताण—हे सगळं सहन करत पोलीस आपलं काम करत राहतो. मात्र निद्रानाश, चिडचिड, नैराश्य, व्यसनं याबद्दल बोलायला फारसं कोणी तयार नसतं. पोलीस आत्महत्या करतो, तेव्हा तो फक्त “एक आकडा” (Police Stress) ठरतो.
पोलीसांच्या घरात भिंती असतात, पण बाबा अनेकदा नसतो. पत्नी असते, पण जोडीदारासाठी वेळ नसतो. आई-वडील असतात, पण आधार समाजासाठी रस्त्यावर उभा असतो.आजच्या काळात असं वाटू लागलं आहे की पोलीस असणं म्हणजेच जणू एक गुन्हा ठरलाय. एक चुकीचा व्हिडिओ संपूर्ण यंत्रणेला दोषी ठरवतो, तर हजारो चांगली कामं कुठेच दिसत (Police Stress) नाहीत.
पोलीस देव नाही. तो चुकू शकतो.पण तो समाजाचा शत्रूही नाही.आज आपण त्याला अपमानित करतो आणि उद्या त्याच्याकडून निस्वार्थ सेवेची अपेक्षा ठेवतो—ही विसंगती समाजाने समजून घेण्याची वेळ आली(Police Stress) आहे.
ज्या समाजात रक्षकच तुटतो, तो समाज फार काळ सुरक्षित राहू शकत नाही.
पोलीसाला देवत्व नको,
पण माणूस म्हणून जगण्याचा हक्क तरी नक्कीच(Police Stress) हवा.

