प्रतिनिधी :आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकांसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमधील त्रुटींविरोधात महाविकास आघाडी आक्रमक भूमिका घेतली आहे. या याद्यांतील गंभीर चुका दुरुस्त करण्याची मागणी करत आज आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर प्रतिकात्मक मतदार याद्या जाळून निवडणूक विभागाचा (PCMC Voter List Protest) तीव्र निषेध नोंदवला.
या आंदोलनात शिवसेना (ठाकरे गट) चे माजी आमदार गौतम चाबुकस्वार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे, नेत्या सुलक्षणा शीलवंत धर, काँग्रेस नेत्या मनीषा गरुड यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले (PCMC Voter List Protest)होते.
महापालिका प्रवेशद्वारावर झालेल्या या आंदोलनात नेत्यांनी आरोप केला की, भारतीय जनता पक्षाच्या निर्देशानुसार निवडणूक आयोग मतदार याद्या तयार करत असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळत आहेत. अशा अपूर्ण व चुकीच्या मतदार याद्यांसह निवडणूक प्रक्रियेला सामोरे जाणे शक्य नाही, असे आघाडीने (PCMC Voter List Protest) स्पष्ट केले.
“या याद्यांतील त्रुटी आधी दुरुस्त करा, मगच निवडणुका घ्या,” अशी ठाम मागणी करत महाविकास आघाडीने प्रतिकात्मक मतदार याद्या जाळून निषेध व्यक्त केला. निवडणूक विभागाने तातडीने त्रुटी दुरुस्त कराव्यात, अन्यथा पुढील आंदोलन तीव्र केले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात (PCMC Voter List Protest) आला.
