Home प्रेरणा / यशकथा Bhausaheb Bhoir:मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच देणार : भाऊसाहेब भोईर; पत्रकार भवनासाठीही सहकार्याचे आश्वासन

Bhausaheb Bhoir:मराठी पत्रकार संघाच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच देणार : भाऊसाहेब भोईर; पत्रकार भवनासाठीही सहकार्याचे आश्वासन

मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी-चिंचवड शहरातील नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार. पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच आणि प्रशस्त पत्रकार भवनासाठी सहकार्याचे भाऊसाहेब भोईर यांचे आश्वासन.

by Admin
Spread the love

पिंपरी : पत्रकार हा समाजाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपल्या परिसरातील चांगल्या-वाईट घटना, समस्या आणि विविध घडामोडी समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी पत्रकार प्रतिकूल परिस्थितीतही आपले कर्तव्य बजावत असतो. हे काम करताना पत्रकार केवळ आपले कर्तव्य पार पाडत असल्याच्या भावनेने कार्यरत असतो. त्यामुळे समाजातील या महत्त्वाच्या घटकासाठी सर्वतोपरी मदत करण्याबरोबरच पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य कवच उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी जाहीर केले.

मराठी पत्रकार संघाच्या पिंपरी-चिंचवड शहरातील नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचा सत्कार समारंभ महापालिकेतील भा. वि. कांबळे पत्रकार कक्षात उत्साहात पार पडला. यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, मराठी पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष रोहित खर्गे, महिला फोरम अध्यक्षा अर्चना मेंगडे, कार्याध्यक्ष दादाराव आढाव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना भाऊसाहेब भोईर म्हणाले, “पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. समाजातील विविध प्रश्न प्रशासन आणि लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचविण्याचे तसेच प्रशासनाच्या कामाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वाचे काम पत्रकार करतात. अनेकदा प्रतिकूल परिस्थितीतही पत्रकार आपले कर्तव्य पार पाडतात. त्यामुळे पत्रकारांच्या अडचणी सोडविण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्याची सुरक्षितता मिळावी यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करू.”

पत्रकारांच्या कामाचे स्वरूप लक्षात घेता त्यांना अनेकदा विविध आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यामुळे पत्रकारांच्या सुरक्षिततेबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याचीही काळजी घेणे आवश्यक आहे. या दृष्टिकोनातून पत्रकारांसाठी आरोग्य विमा, आरोग्य तपासणी शिबिरे आणि अन्य कल्याणकारी उपक्रम राबविण्यासाठी सहकार्य करण्याची भूमिका भोईर यांनी व्यक्त केली.

मराठी पत्रकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक इनामदार यांनी संघाच्या आगामी उपक्रमांची माहिती दिली. पत्रकारांना हेल्मेट वाटप, आरोग्य विमा, पत्रकारांसाठी परवडणारी व हक्काची घरे तसेच अन्य कल्याणकारी योजनांसाठी संघाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकारांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेसाठी शासन, महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविण्याचा संघाचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी नमूद केले.

येत्या काही दिवसांत मराठी पत्रकार संघातील पत्रकार सदस्यांना हेल्मेटचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष रोहित खर्गे यांनी दिली. पत्रकारांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत वाहतूक नियमांचे पालन आणि रस्ते सुरक्षेबाबतही जनजागृती करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि पत्रकार कल्याणकारी उपक्रम राबवून मराठी पत्रकार संघाच्या लौकिकात भर घालणारे काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्याध्यक्ष दादाराव आढाव यांनी केले. यावेळी संघाचे उपाध्यक्ष संतलाल यादव, सचिव बजरंग मासाळ, खजिनदार संतोष जाधव, संपर्कप्रमुख संतोष महामुनी, पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष कालिंदर शेख, संदीप सोनार, श्रीधर जगताप, शफिक शेख, विवेक कुलकर्णी, नागेश खजूरगीकर, अजय कुलकर्णी, सीताराम मोरे, लीना माने, पूनम पाटील, राजश्री आतकरे, संगीता पाचंगे आदी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.

पत्रकारांच्या प्रश्नांवर संघटितपणे काम करण्याबरोबरच पत्रकारांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्यविषयक सुविधा, पत्रकारांची सुरक्षितता, परवडणारी घरे आणि अन्य कल्याणकारी योजनांसाठी पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षिततेसाठी संघाच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न करण्यात येतील, असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक इनामदार यांनी केले, तर आभार संतोष महामुनी यांनी मानले.

 

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00