(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी दि. २९) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाअंतर्गत सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार १०, २० आणि ३० वर्षे नियमित सेवा पूर्ण केलेल्या पात्र अधिकारी-कर्मचाऱ्यांना अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा लाभ मंजूर करण्यात आला असून, त्याबाबतचे प्रशासकीय आदेश जारी करण्यात आले (PCMC Assured Career)आहेत.
महापालिका आयुक्तांच्या मान्यतेनंतर शासन निर्णय, पदोन्नती समितीचे निर्णय आणि सेवाप्रवेश नियमांच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. लाभ मंजूर करताना सेवा अभिलेख, पदोन्नतीसाठी आवश्यक पात्रता, विभागीय परीक्षा, गोपनीय अहवाल, प्रलंबित चौकशी, न्यायालयीन प्रकरणे आदी बाबींची पडताळणी करण्यात येणार असून, पात्र कर्मचाऱ्यांना पुढील वेतनस्तराचा लाभ मिळणार आहे.
या निर्णयानुसार १० वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या २१६ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पहिला, २० वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या ३१९ जणांना दुसरा, तर ३० वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या २३७ अधिकारी व कर्मचाऱ्यांना तिसरा लाभ मंजूर करण्यात आला आहे. उर्वरित पात्र कर्मचाऱ्यांची प्रशासकीय प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाणार आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, सेवाज्येष्ठतेनुसार आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणे हा कर्मचाऱ्यांचा अधिकार असून, या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढून प्रशासन अधिक कार्यक्षम होण्यास मदत होईल.
अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी सांगितले की, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होताच उर्वरित पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही नियमानुसार या योजनेचा लाभ देण्यात येणार असून, ही प्रक्रिया पारदर्शक व वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील(PCMC Assured Career) आहे.
