पिंपरी-चिंचवड :“१९९२ पासून आम्ही अजितदादा पवार यांच्या सानिध्यात होतो. आमचे प्रश्न मांडायचे आणि त्यावर त्वरित तोडगा काढायचा हे जणू ठरलेले गणित होते,” अशा शब्दांत पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी आपल्या भावना व्यक्त (Sandeep Belasare)केल्या.
दादांचे नेतृत्व हे केवळ राजकीय नव्हे, तर प्रशासन आणि उद्योगविश्व यांना जोडणारे होते. उद्योजकांच्या प्रश्नांवर थेट संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका लावून, जागेवरच निर्णय घेण्याची त्यांची कार्यपद्धत होती. उद्योगधंद्यांना बळकटी देण्याचे मोलाचे काम अजितदादांनी सातत्याने केले, असेही बेलसरे यांनी सांगितले.
“दादांच्या जाण्याने घरचा माणूस गेला आहे. आज उद्योजक पोरके झाले असून, आमच्यासाठी झटणारा खरा आधारवड हरपला आहे,” अशी हळहळ त्यांनी व्यक्त केली.
कुदळवाडीच्या प्रश्नावर नुकतीच दादांची भेट झाल्याचे सांगत बेलसरे म्हणाले, “समित्यांची निवडणूक संपली की या प्रश्नावर निश्चित तोडगा काढू, असे आश्वासन त्यांनी दिले होते. मात्र ती भेट शेवटची ठरेल, असे कधी वाटले नव्हते.”
दादांच्या अकाली जाण्याने पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण उद्योगविश्वात शोककळा पसरली असून, उद्योगधंद्यांसाठी ठामपणे उभे राहणारे नेतृत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.
— संदीप बेलसरे
अध्यक्ष, पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटना
