Home मनोरंजन Sathvanitli Gaani 11:साठवणीतली गाणी पुष्प ११ : धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना; मुक्या भावनांना शब्दरूप

Sathvanitli Gaani 11:साठवणीतली गाणी पुष्प ११ : धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना; मुक्या भावनांना शब्दरूप

‘धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना’ या अजरामर गीताचे रसग्रहण. ‘धाकटी बहीण’ चित्रपट, जगदीश खेबूडकर यांची लेखणी आणि बाबूजी-आशाबाईंच्या स्वरांची अवीट गोडी.

by Admin
Spread the love

साठवणीतली गाणी:पुष्प ११ वे-

धुंदी कळ्यांना.. धुंदी फुलांना 

शब्द रूप आले मुक्या भावनांना 

रसिकहो, आदाब! 🙏🙏 कसे आहात? सर्वप्रथम बाप्पाच्या आगमनाच्या तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा! बाप्पा सर्वांच्या आयुष्यात आनंद आणि निरामय सुख चिरकाल ठेवो, हीच प्रार्थना. 🙏🙏 गणरायाच्या आगमनाने वातावरणात भक्तिभाव, उत्साह आणि आनंदाची एक वेगळीच धुंदी निर्माण होते. आणि या धुंद वातावरणात एखादे मनाला भिडणारे गाणे कानावर पडले, की मन नकळत जुन्या आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलू लागते. आजच्या ‘साठवणीतली गाणी’ या सदरातील गीतही असेच मनाला धुंद करणारे, मुक्या भावनांना शब्दरूप देणारे आणि प्रेमाच्या अव्यक्त अनुभूतींना सुरेल अभिव्यक्ती देणारे (Sathvanitli Gaani 11) आहे.

 

“धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना

शब्दरूप आले मुक्या भावनांना

धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना

शब्दरूप आले मुक्या भावनांना…”

 

खरं सांगू का, हे गाणे म्हणजेच ‘साठवणीतली गाणी’ या सदराचे मूळ आहे. माझे प्रिय मित्र आणि पिंपरी-चिंचवड शहरातील युवा, पण यशस्वी उद्योजक प्रशांत मातेरे आणि कृषी अधिकारी नवीनचंद्र बोऱ्हाडे यांनीच मला ही लेखमाला लिहिण्याचा आदेश दिला. तेही याच गाण्यामुळे! मागील काही काळापासून मी अकाली निवृत्ती घेतल्यानंतर प्रत्येक गोष्टीमागे रामरायाची इच्छा असते, या दादांच्या ठाम विचारसरणीमुळे अगदीच तारुण्यात व्यवसाय केल्यामुळे मनातल्या सुप्त इच्छांना पूर्ण करण्यासाठी धडपडतोय. आयुष्याच्या धावपळीत अनेक गोष्टी मनात दडून राहतात. काही इच्छा अपूर्ण राहतात, काही छंद बाजूला पडतात; पण निवृत्तीनंतर त्या सुप्त इच्छांना पुन्हा जागवण्याची संधी मिळते. माझ्याबाबतीतही तेच घडते आहे. सकाळी खेळ, वॉक, स्विमिंग अशा गोष्टी करताना कधी प्रशांत, तर कधी नवीन सोबती असतात. तिघांनाही गाण्याची आवड आहे. अर्थात, ऐकण्याची! 😄😄 गायला लागलो तर ग्रुप फुटेल! 😄😄 त्यात मराठी गाणे विशेष आवडीचे. एकदा अशाच एका गाण्यावरून प्रशांत म्हणाला, “विवेकराव, तुम्ही समीक्षण करा.” आता त्याला वाटतो मी समीक्षक, मी काय करू? 😄😄 आणि मग या सदराचा जन्म झाला. एखाद्या गाण्यावर गप्पा मारता मारता त्यातील शब्द, भावना, संगीत, आवाज आणि अभिनय यांचा मागोवा घेण्याची ही सवयच जडली. तर अशी आम्हाला सवय असते नमनाला घडाभर तेल वापरायची! (Sathvanitli Gaani 11) असो.

 

१९७० साली आलेल्या, म्हणजे माझ्या जन्माच्या आधी प्रदर्शित झालेल्या ‘धाकटी बहीण’ या कृष्णधवल चित्रपटातील हे अजरामर गाणे. ५६ हून अधिक वर्षे झाली, तरीही कानाला अवीट गोडी देणारे हे गोड गीत मराठीतले खरेखुरे सुपरस्टार आणि अष्टपैलू अभिनेते अरुण सरनाईक आणि सुरेखा यांच्यावर चित्रित झाले आहे. हे माझे अतिशय आवडते गाणे आहे. जुन्या कृष्णधवल चित्रपटांची एक वेगळीच जादू असते. पडद्यावरचे रंग नसले, तरी भावनांचे रंग मात्र इतके गडद असतात, की ते थेट मनात उतरतात. या गाण्यातही शब्द, चाल, आवाज आणि पडद्यावरचा अभिनय यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळतो. “धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना, शब्दरूप आले मुक्या भावनांना…” खरंच तर आहे की, प्रत्येक माणसाच्या मनात अनेक सुप्त इच्छा असतात, मुक्या भावना असतात; पण प्रत्येकाला त्या व्यक्त करता येतीलच असे नाही. काही भावना शब्दांच्या पलीकडच्या असतात. काही क्षण असे असतात, जेव्हा मनातील दडलेल्या भावनांना अचानक वाट मिळते. आणि मग त्या भावनांना शब्दांची गरज उरत नाही; नजर, स्पर्श, हसू आणि शांतताही बरंच काही सांगून जाते. पण आपण भेटलोत… कधी? एका धुंद क्षणी… जगाचे सर्व नियम पायदळी तुडवले आणि मग… एकरूपही झालोत! त्या अवीट मिलनाची ही चिरंजीव कथा… वा, क्या कहने! गाण्याच्या सुरुवातीपासूनच एक वेगळी भावावस्था तयार होते. कळ्या आणि फुले यांच्या प्रतिमेतून उमलणारे तारुण्य, प्रेमाची चाहूल आणि मनातल्या भावनांना लाभलेली अभिव्यक्ती, हे सारे किती सहजपणे शब्दांत (Sathvanitli Gaani 11) उतरते!

 

महान गीतकार जगदीश खेबूडकर यांच्या दैवी देणगी लाभलेल्या महान लेखणीतून उपजलेले हे गीत, बाबूजी आणि ‘द ग्रेट’ आशाबाईंनी गायलेले आहे. म्हणूनच हे गीत सुपरहिट ठरले आणि आजही रसिकांच्या मनावर राज्य करते. यातल्या प्रत्येक कडव्याचा अर्थ निव्वळ अप्रतिम आहे. पहिलेच कडवे (Sathvanitli Gaani 11) पाहा…

 

“तुझ्या जीवनी नियतीची जाग आली

माळरानी या प्रीतीची बाग आली

सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा

शब्दरूप आले मुक्या भावनांना…”

 

फक्त जगदीशजीच हा विचार मांडू शकतात! एखाद्याच्या आयुष्यात प्रेमाची चाहूल लागते, तेव्हा आतापर्यंत ओसाड वाटणारे जीवन अचानक फुलांनी बहरलेल्या बागेसारखे भासू लागते. ‘माळरानी या प्रीतीची बाग आली’ ही कल्पना म्हणजे निव्वळ शब्दांची किमया नव्हे, तर प्रेमामुळे बदलून गेलेल्या मनःस्थितीचे सुंदर चित्रण आहे. जिथे आधी एकटेपणा होता, तिथे आता सहवासाची चाहूल आहे. जिथे मनात न बोललेल्या भावनांची गर्दी होती, तिथे आता त्या व्यक्त होऊ लागल्या आहेत. “सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा…” या ओळीतही एक वेगळीच गंमत आहे. मनात दडवून ठेवलेल्या आनंदाला आता जणू नाव मिळाले आहे. प्रेमात पडलेल्या मनाला स्वतःचा आनंदही लपवता येत नाही आणि व्यक्त करतानाही शब्द अपुरे पडतात. पण कधी तुझ्या जीवनी नियतीची जाग (Sathvanitli Gaani 11) आल्यावर… सलाम! 🙏🙏

 

दुसरे कडवे तर प्रेमाच्या नाजूक अनुभूतींना आणखी उंचीवर घेऊन जाते…

 

“तुझा शब्द की थेंब हा अमृताचा

तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा

उगा लाजण्याचा किती हा बहाणा

शब्दरूप आले मुक्या भावनांना…”

 

प्रेमात असताना प्रिय व्यक्तीचा साधा शब्दही अमृतासारखा वाटतो आणि तिचा साधा स्पर्शही चांदण्याच्या हातासारखा भासतो. हा अनुभव प्रत्येकाला शब्दांत सांगता येईलच असे नाही; पण ज्यांनी कधी मनापासून प्रेम केले आहे, त्यांना या ओळींचा अर्थ नक्कीच जाणवेल. प्रिय व्यक्ती समोर आली की उगाच लाजणे, नजर चुकवणे, काहीतरी बोलण्याचा बहाणा करणे आणि मनात मात्र हजारो गोष्टी सुरू असणे… ही प्रेमाचीच तर गंमत! ‘उगा लाजण्याचा किती हा बहाणा’ या ओळीतून प्रेमातील लाजरेपणा, संकोच आणि गोड हुरहूर किती सुंदरपणे व्यक्त झाली आहे! गाण्याचे शब्द ऐकताना आपणही नकळत त्या भावविश्वात जाऊन पोहोचतो. बाबूजींचा भारदस्त, भावपूर्ण आवाज आणि आशाबाईंच्या स्वरातील नाजूक लय यामुळे या ओळींचा परिणाम अधिकच खुलतो. संगीतकाराच्या चालीने या भावनांना मिळालेली साथ तर (Sathvanitli Gaani 11) अप्रतिमच!

 

मला तिन्ही कडवी प्रचंड भावलीत; पण शेवटचे कडवे म्हणजे चेरी ऑन द (Sathvanitli Gaani 11) टॉप! 🙏🙏

 

“चिरंजीव होई कथा मिलनाची

तृषा वाढते तृप्त या लोचनांची

युगांचे मिळावे रूप या क्षणांना

शब्दरूप आले मुक्या भावनांना…”

 

मानवी सांसारिक जीवनात मिलनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मोह आहे, कोणालाच सुटला नाही तो! पण या कडव्यातील भावना केवळ दोन व्यक्तींच्या मिलनापुरत्या मर्यादित राहत नाहीत. प्रिय व्यक्तीच्या सहवासात लाभलेला एखादा क्षण आयुष्यभर स्मरणात राहावा, त्या क्षणाला चिरंतन महत्त्व प्राप्त व्हावे, ही त्यामागची भावना आहे. “तृषा वाढते तृप्त या लोचनांची…” किती विलक्षण विरोधाभास आहे! डोळ्यांना समाधान मिळाले, तरी त्या दर्शनाची ओढ अधिकच वाढते. प्रेमात तृप्ती असते, पण त्याच वेळी पुन्हा भेटण्याची आसही असते. आणि “युगांचे मिळावे रूप या क्षणांना…” या ओळीत तर गीतकाराने कमाल केली आहे. आयुष्यातील एखादा छोटासा क्षण इतका सुंदर असतो, की तो क्षण जणू युगानुयुगे टिकावा, अशी मनापासून इच्छा होते. त्या मिलनातून फुललेल्या क्षणांना चिरंजीव रूप मिळावे, हा या कडव्याचा सारांश, गाभाच अफाट आहे. प्रेमाच्या एका क्षणाला काळाच्या पलीकडे नेण्याची ताकद या शब्दांत आहे. या लेखणीला, आवाजाला आणि त्यावरील अभिनयाला फक्त मनापासून कडक (Sathvanitli Gaani 11)सलाम! 🙏🙏

 

अशी आपली समृद्ध वारसा लाभलेली ही संगीतसृष्टी! त्या काळातील गीतकारांनी शब्दांना दिलेली खोली, संगीतकारांनी चालीतून निर्माण केलेली जादू, गायक-गायिकांनी स्वरांतून ओतलेली भावना आणि कलाकारांनी पडद्यावर साकारलेले प्रसंग, यामुळे ही गाणी काळाच्या ओघातही ताजी राहिली आहेत. आजच्या वेगवान युगात अनेक नवी गाणी येतात, काही गाजतात, काही विस्मरणात जातात; पण अशी गाणी मात्र पिढ्यान्‌पिढ्या रसिकांच्या मनात घर करून राहतात. कारण ती केवळ ऐकली जात नाहीत, तर अनुभवली जातात. आपल्या मनातल्या एखाद्या कोपऱ्यात जपून ठेवलेल्या आठवणींना ती अलगद स्पर्श करून जातात. म्हणूनच या संगीतसृष्टीला आपण विनम्रपणे अभिवादन करू आणि तिच्याप्रति केवळ आणि केवळ कृतज्ञताच व्यक्त करू. बरोबर (Sathvanitli Gaani 11) ना?

 

विवेक दिगंबरराव कुलकर्णी

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00