Home माझं पिंपरी चिंचवड NCP Split Reunion:पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; भाजपला रोखण्यासाठी थेट रणशिंग

NCP Split Reunion:पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; भाजपला रोखण्यासाठी थेट रणशिंग

नगरसेवक फोडाफोडी, भाजपाची फिल्डिंग आणि ईडीच्या ‘अदृश्य दबावां’मुळे राजकारण पेटले

by Admin
Spread the love

(विशेष संपादकीय :विवेक कुलकर्णी):पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सध्या जे घडते आहे, ते केवळ निवडणूकपूर्व गणित नसून थेट सत्तासंघर्षाचे रणांगण बनले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांनी मतभेद बाजूला ठेवत एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याने भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घोषणेनंतर शहरातील राजकीय वातावरण अक्षरशः स्फोटक बनले असून, भाजपविरोधात थेट लढाईची तयारी सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत (NCP Split Reunion) आहेत.

गेल्या काही वर्षांत पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ही प्रक्रिया केवळ राजकीय मतपरिवर्तन नव्हे, तर सुनियोजित फोडाफोडीचा भाग असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून सातत्याने केला जात आहे. राष्ट्रवादीचे बळ कमी करण्यासाठी भाजपाने नगरसेवकांना लक्ष्य करत प्रभागनिहाय फिल्डिंग लावली, सत्ता, निधी आणि भविष्यातील सुरक्षिततेचे आश्वासन देत खेळी खेळली गेली, अशी उघड चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू (NCP Split Reunion)आहे.

याच फोडाफोडीच्या राजकारणासोबत आणखी एक गंभीर मुद्दा दबक्या आवाजात चर्चेत आहे. तो म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणांचा अप्रत्यक्ष दबाव. ईडी, आयकर विभाग यांसारख्या संस्थांच्या चौकशीची भीती दाखवून काही लोकप्रतिनिधींना ‘मैत्रीचा सल्ला’ देण्यात आल्याचे आरोप राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून होत आहेत. थेट धमकी दिली गेली नसली, तरी फाईली उघडण्याचे संकेत, चौकशीच्या हालचाली आणि अचानक सक्रिय झालेल्या यंत्रणांमुळे अनेक नेते दबावाखाली गेल्याची चर्चा शहरभर पसरली आहे. या अदृश्य दबावांमुळेच राष्ट्रवादीत गळती वाढल्याचा आरोप आता उघडपणे केला जात (NCP Split Reunion) आहे.

याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी घेतलेली भूमिका अधिक महत्त्वाची ठरत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपला रोखायचे असेल, तर फाटाफुटीचे राजकारण थांबवून एकजूट हाच एकमेव पर्याय असल्याचा स्पष्ट संदेश या घोषणेतून देण्यात आला आहे. दोन्ही राष्ट्रवादी गटांनी एकत्र येऊन भाजपच्या रणनीतीला उत्तर देण्याचा निर्णय घेतल्याने, आतापर्यंत भाजपच्या बाजूने झुकलेले राजकीय समीकरण अचानक बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

भाजपसाठी ही परिस्थिती अनपेक्षित धक्का मानली जात आहे. भाजपमध्ये गेलेले माजी राष्ट्रवादी नगरसेवक, त्यांच्या जोरावर उभारलेली संघटनात्मक रचना आणि प्रभागनिहाय आखलेली रणनिती आता अडचणीत येण्याची शक्यता आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अनेक प्रभागांत थेट टक्कर मिळणार असून, निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यांवर नव्हे तर फोडाफोडी, दबाव आणि सत्तेच्या गैरवापराच्या आरोपांवर रंगणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. जागावाटप, उमेदवारांची निवड, प्रचाराची दिशा आणि नेतृत्वाचे चेहरे यावर जोरदार खलबते सुरू आहेत. भाजपने वापरलेल्या कथित दबावाच्या राजकारणाला जनतेसमोर आणण्याची रणनीतीही आखली जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

एकूणच, पिंपरी-चिंचवडमध्ये आगामी महापालिका निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची लढाई न राहता, भाजप विरुद्ध एकत्र आलेली राष्ट्रवादी अशी थेट सत्ता-विरोधाची लढाई ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. दोन्ही राष्ट्रवादींची ही एकजूट भाजपच्या राजकीय डावपेचांना कितपत छेद देते, हे येणाऱ्या काळात ठरणार असले तरी, सध्या तरी शहरातील राजकारण कमालीचे तापले आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00