पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आक्रमक; आज भव्य कार्यकर्ता मेळावा
पिंपरी प्रतिनिधी:पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच भाजपने शहरात आक्रमक मोहीम सुरू केली आहे. आगामी निवडणुकीत पुन्हा स्वबळावर सत्ता मिळवण्याच्या निर्धारातून आज (शनिवार, दि. २२) सकाळी ११ वाजता प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात शहरातील प्रभावशाली नेते मोठ्या प्रमाणात प्रवेश करणार असल्याची चर्चा असून, भाजप आपली वाढती राजकीय ताकद दाखवण्याच्या तयारीत आहे.
या मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे विशेष मार्गदर्शन करणार आहेत. पिंपरी चिंचवड महापालिका पुन्हा जिंकण्यासाठीची रणनीती आणि संपूर्ण ‘ब्लूप्रिंट’ या ठिकाणी मांडली जाणार आहे. आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, माजी खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित राहून शहरातील निवडणुकीचे वातावरण तापवणार आहेत.
“आपापल्या टीमसह मोठ्या संख्येने उपस्थित राहा,” असे आवाहन शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी केले आहे.
रवींद्र चव्हाण हे येणाऱ्या काळातील प्रचाराची दिशा, विरोधकांना दिले जाणारे राजकीय उत्तर आणि शहरात भाजपचे वर्चस्व अधिक बळकट करण्यासाठीची रणनीती याबाबत थेट मार्गदर्शन करणार आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतून आणि शिवसेनेच्या दोन गटांतून भाजपमध्ये प्रवेशाची चळवळ वाढत असून, शहरातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असल्याचे स्पष्ट होत आहे. “जिंकणाऱ्यांच्या बाजूला उभे राहावे” हा संदेश अनेक नेत्यांनी घेतल्याने भाजपकडे झुकणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ठाणे–कल्याण महापालिकेत दिग्गज नेत्यांना प्रवेश देऊन भाजपने अलीकडेच मोठा राजकीय टप्पा साधला. त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवडमध्येही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक प्रवेश करणार असल्याची चर्चा असून, भाजपने थेट आव्हान निर्माण केले आहे.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आजचा मेळावा हा फक्त औपचारिक कार्यक्रम नसून, आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा ‘राजकीय बिगुल’ मानला जात आहे. शहरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि इच्छुकांमध्ये प्रचंड उत्सुकता असून, “ही निवडणूक म्हणजे सत्ता पुन्हा मिळवण्याची निर्णायक लढाई” असा सूर पक्षात उमटताना दिसत आहे.

mla jagtap

