पिंपरी : शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १० लाखांची फसवणूक, स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने ४ लाखांची रोकड लंपास करणे, ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून १० लाख रुपये उकळणे, तसेच चोरी, मारहाण आणि बेकायदेशीर प्रवेशाच्या विविध घटनांप्रकरणी पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले आहेत.
शेअर मार्केटमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १० लाखांची फसवणूक
पिंपरी : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यक्तीची १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सुरुवातीला नफा देण्याचे आश्वासन देण्यात आले; मात्र मुद्दल आणि परतावा दोन्ही न देता फसवणूक करण्यात आली.
याप्रकरणी रवींद्र सुभाषराव शिलवंत (वय ४८, रा. मासुळकर पार्क, पिंपरीगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार उमेश हरिराम कलानी (वय अंदाजे २८, रा. पिंपरी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल २०२४ ते १९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आरोपीने फिर्यादीच्या पिंपरी येथील कार्यालयात जाऊन ‘यू.के. ग्रुप ऑफ कंपनी’च्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये १० लाख रुपये गुंतवल्यास दरमहा एक लाख रुपये परतावा देण्याचे आमिष दाखवले. दहा महिने पूर्ण झाल्यानंतर मुद्दल आणि नफा एकत्रित परत करण्याचे आश्वासनही दिले. मात्र, मुदत संपल्यानंतर कोणतीही रक्कम परत न करता फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली.
—
बनावट सोने देऊन व्यापाऱ्याची ४ लाखांची फसवणूक
वासुली फाटा : स्वस्तात सोने विकण्याचे आमिष दाखवून एका व्यापाऱ्याची बनावट दागिन्यांद्वारे ४ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना वासुली फाटा येथे घडली.
याबाबत दिलीप भाऊ सावंत (वय ३९, रा. करंजविहीरे, ता. खेड) यांनी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने फोन करून त्यांना वासुली फाटा येथे बोलावून घेतले. तेथे विश्वास संपादन करून १० लाख रुपये किमतीचे सोने काही लाखांत देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यानंतर फिर्यादीने पतसंस्थेत सहा तोळे सोने तारण ठेवून ४ लाख रुपये रोख आणले. आरोपींनी उर्वरित रक्कम नंतर देण्याचे सांगून सोन्यासारखे दिसणारे बनावट दागिने त्यांच्या स्वाधीन केले आणि ४ लाखांची रोकड घेऊन पलायन केले.
—
‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून ज्येष्ठ नागरिकाची १० लाखांची ऑनलाइन फसवणूक
चिखली : सीबीआय, आरबीआय आणि पोलीस अधिकारी असल्याचे भासवून ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत सायबर भामट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाकडून १० लाख रुपये उकळल्याचा प्रकार चिखली परिसरात उघडकीस आला आहे.
याप्रकरणी मनोज कुमार उपाध्याय (वय ५९, रा. मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्हॉट्सॲप कॉल करणाऱ्या भामट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ ते १६ सप्टेंबरदरम्यान आरोपींनी फिर्यादीला व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉल केला. सीबीआय, आरबीआय आणि पोलीस अधिकारी असल्याचे भासवून त्यांच्या नावावर बेकायदेशीर व्यवहार झाल्याचे सांगितले. त्यानंतर ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून बँक खात्यात पैसे पाठवण्यास भाग पाडले. या प्रकारात फिर्यादीची एकूण १० लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली.
—
जुन्या वादातून वृद्धावर काठीने हल्ला
पिंपळगाव : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एका ७५ वर्षीय वृद्धाला काठीने मारहाण करून दुखापत केल्याची घटना खेड तालुक्यातील पिंपळगाव येथे घडली.
याप्रकरणी गणपत गेनभाऊ शेळके (वय ७५, रा. पिंपळगाव) यांनी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नवनाथ मास्ती शिंदे (वय ५०, रा. पिंपळगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, जिल्हा परिषद शाळेजवळ आरोपीने फिर्यादीसोबत वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी आरोपीने फिर्यादीच्या हातातील स्टीलची काठी हिसकावून घेत त्यांच्या उजव्या पायाच्या गुडघ्याखाली मारून दुखापत केली.
—
उसणवारीच्या ५०० रुपयांवरून तरुणावर लोखंडी कड्याने हल्ला
नेहरुनगर : उसणवारीचे ५०० रुपये परत न दिल्याच्या कारणावरून एका २२ वर्षीय तरुणावर टोळक्याने हल्ला केला. लोखंडी कड्याने डोक्यात मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना नेहरुनगर परिसरात घडली.
याबाबत अजित मिलिंद सपकाळ (वय २२, रा. नेहरुनगर, पिंपरी) याने संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार समीर सोनार, सागर आणि त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, अजित याने आरोपीच्या मामाकडून घेतलेले ५०० रुपये परत केले नव्हते. या कारणावरून आरोपींनी त्याला गाठून हाताने मारहाण केली. जीव वाचवून पळत असताना आरोपींनी पाठलाग करून संतोषीमाता चौकाजवळ त्याला गाठले. यावेळी एका साथीदाराने लोखंडी कड्याने त्याच्या डोक्यात मारहाण केली. या हल्ल्यात अजितच्या डोक्याला सात ठिकाणी जखमा झाल्या आहेत.
—
दुचाकी अपघातात चालकाचा मृत्यू; मित्र गंभीर जखमी
आकुर्डी : भरधाव दुचाकी फुटपाथवरील दुभाजकाच्या पोलला धडकल्याने झालेल्या अपघातात १९ वर्षीय चालकाचा मृत्यू झाला, तर मागे बसलेला त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ही घटना १८ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास आकुर्डी येथील पीसीसीईओ कॉलेज आणि प्रकाशगड सोसायटीजवळ घडली.
मयत शशांक अनंत लांडगे (वय १९, रा. रावेत) असे मृत चालकाचे नाव आहे. याप्रकरणी जखमी यश सुनील आव्हाड (वय १८) याने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, यश आणि शशांक हे मित्राची दुचाकी घेऊन जात होते. त्यावेळी शशांकने दुचाकी भरधाव व निष्काळजीपणे चालवून फुटपाथवरील पोलला जोरदार धडक दिली. या अपघातात शशांकचा जागीच मृत्यू झाला, तर यश गंभीर जखमी झाला.
—
बँकेतून काढलेली २ लाखांची रोकड टपरीसमोरून लंपास
सुंबरेनगर : बँकेतून काढून दुचाकीच्या हुकाला टांगलेली दोन लाख रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली पिशवी अज्ञात चोरट्याने लंपास केली. ही घटना सुंबरेनगर परिसरात घडली.
याबाबत सुनील तुकाराम कारले (वय ५७, रा. चांदूसगाव, ता. खेड) यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पांढरा शर्ट आणि राखाडी पॅन्ट घातलेल्या अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, सुनील यांनी बँकेतून दोन लाख रुपये काढून ते पिशवीत ठेवले आणि पिशवी दुचाकीच्या सीटखालील हुकाला अडकवली. त्यानंतर चुलत्यांच्या टपरीसमोर दुचाकी उभी करून ते पेरणीबाबत चर्चा करत असताना अज्ञात चोरट्याने संधी साधून रोकड व कागदपत्रे असलेली पिशवी चोरून नेली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
—
ताथवडे येथून दोन दुचाकी चोरीला
ताथवडे : घरासमोर लॉक करून पार्क केलेल्या दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ताथवडे येथील अशोकनगर परिसरात घडली.
याप्रकरणी बापू आजिनाथ गायकवाड (वय ४५, रा. ताथवडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, १८ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास ताथवडे येथील शाहू कॉलेजजवळ ४० हजार रुपये किमतीच्या दोन होंडा शाईन दुचाकी पार्क करण्यात आल्या होत्या. अज्ञात चोरट्यांनी दोन्ही वाहनांचे लॉक तोडून त्या चोरून नेल्या.
—
फायनान्स कंपनीने सील केलेला फ्लॅट तोडून बेकायदेशीर ताबा
मोशी : फायनान्स कंपनीने सील केलेला फ्लॅट बेकायदेशीरपणे उघडून त्यात अनधिकृत प्रवेश करून ताबा मिळवल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत किरण रामचंद्र पवार (वय ३८, रा. रास्ता पेठ, पुणे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोहन विश्वास सपकाळ (वय ५६) आणि मंगल मोहन सपकाळ (वय ५०, दोघे रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादीनुसार, पीएनबी हाऊसिंग फायनान्स कंपनीने बोऱ्हाडेवाडी येथील फ्लॅटचा कायदेशीर ताबा घेऊन त्याला सील केले होते. आरोपींनी बँकेचे सील व कुलूप तोडून मालमत्तेचे नुकसान केले. त्यानंतर फ्लॅटमध्ये बेकायदेशीरपणे प्रवेश करून ताबा मिळवला.
—
सील तोडून ऑफिसमध्ये बेकायदेशीर प्रवेश
चरहोली बुद्रुक : फायनान्स कंपनीने सील केलेल्या कार्यालयाचे कुलूप व सील तोडून बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत विश्वानंद अशोक कानडे (वय ३६, रा. धायरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोज रमेश पाटील (वय ४५) आणि सपना अशोक पाटील (वय ३२, दोघे रा. बोफखेल, पुणे) यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चरहोली बुद्रुक येथील ‘तनिष्क ऑर्चिड’ फेज-२ मधील ऑफिस क्रमांक २० आणि २१ ला फायनान्स कंपनीने सील लावले होते. आरोपींनी हे सील व कुलूप तोडून मालमत्तेचे नुकसान केले आणि कार्यालयात बेकायदेशीरपणे प्रवेश केला.
—
चाकणमध्ये प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक पकडला
चाकण : महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखूची अवैध वाहतूक करणारा ट्रक अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत पकडण्यात आला. ही कारवाई चाकण येथील तळेगाव चौक परिसरात करण्यात आली.
याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी ऋषिकेश रमेश मरेवार यांनी चाकण उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी नपीस मेहबूब खान (वय ४०, रा. हरियाणा) याला अटक करण्यात आली आहे. तसेच निलेश राठी (बुलढाणा), अरुण पाटील (जळगाव), संजय माटा (इंदूर) आणि वाहनमालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी तळेगाव चौक, चाकण येथील नाशिक-पुणे महामार्गावर संशयास्पद टाटा ट्रक (क्रमांक एमएच १८ बीझेड २३५०) थांबवून तपासणी केली. त्यावेळी ट्रकमध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला मोठ्या प्रमाणावर गुटखा, सुगंधित तंबाखू आणि इतर प्रतिबंधित अन्नपदार्थ आढळून आले. आर्थिक फायद्यासाठी संगनमताने ही अवैध वाहतूक केली जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
—
एच. ए. मैदानात गांजा ओढताना तरुणाला अटक
पिंपरी : नेहरुनगर येथील एच. ए. मैदानावर चिलिममध्ये गांजा भरून सेवन करणाऱ्या ३२ वर्षीय तरुणावर पोलिसांनी कारवाई केली.
पोलीस शिपाई भागवत अंकुश गायकवाड यांच्या फिर्यादीवरून मिथुन नाथू राठोड (वय ३२, रा. इंदिरानगर, चिंचवड) याच्याविरुद्ध संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी रात्री आरोपी एच. ए. मैदानावर चिलिममध्ये गांजा भरून ओढताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गांजा सेवनाचे साहित्य जप्त केले.
—
इंदिरानगरमध्ये गांजा सेवन करणाऱ्या तरुणावर कारवाई
चिंचवड : सार्वजनिक ठिकाणी चिलिममध्ये गांजा भरून सेवन करणाऱ्या ३० वर्षीय तरुणावर पोलिसांनी कारवाई केली.
पोलीस शिपाई वैभव दत्तात्रय सोन्ने यांच्या फिर्यादीवरून सोमनाथ पोपट बनसोडे (वय ३०, रा. इंदिरानगर, चिंचवड) याच्याविरुद्ध संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, इंदिरानगर परिसरात आरोपी गांजाचे सेवन करत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गांजा सेवनाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

