काल-परवा एका कुठल्यातरी फुटकळ ग्रुपवर हिंदी चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेते, “ही-मॅन” म्हणून प्रसिद्ध असलेले आणि भाजपाचे माजी खासदार धर्मेंद्र गेले अशी अफवा पसरली. आणि बघता बघता तिचा वनवा पेटला. कुठे श्रद्धांजलीचे पोस्ट, कुठे दुःखाचे संदेश, कुठे शोकसभा… सगळीकडे दु:खाचा माहोल. पण अरे, कुणी तरी — अगदी एक जण तरी — विचार केला का की ही बातमी खरी आहे की खोटी? कोणीतरी त्यांच्या घरच्यांना विचारलं का? काय वाटत असेल त्यांच्या कुटुंबाला, जेव्हा त्यांनी पाहिलं की जिवंत माणसाला जगभरातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे?
आज धर्मेंद्र यांच्याबद्दल हे झालं, उद्या दुसऱ्याबद्दल होईल. हे पहिल्यांदाच घडले का? अजिबात नाही. सोशल मीडियाच्या या भुलभुलैय्यात आपण सगळे इतके गुरफटलो आहोत की कोणती गोष्ट खरी, कोणती खोटी, हे समजण्याची संवेदना आपण हरवली आहे. दिलीप कुमार, अमिताभ बच्चन, लता मंगेशकर यांच्याबाबतही अशीच बनावट बातमी कित्येकदा पसरली. काही क्षणात लोक श्रद्धांजली वाहतात, फोटो एडिट करून पोस्ट करतात, आणि दोन दिवसांनी जेव्हा सत्य बाहेर येतं, तेव्हा तेच लोक दुसऱ्या दिशेने वळतात.
ही केवळ अफवा नाही, ही असंवेदनशीलतेची परिसीमा आहे. आपण विचारही करत नाही की अशा खोट्या बातम्यांमुळे एखाद्या जिवंत व्यक्तीच्या मनावर, त्यांच्या कुटुंबावर, चाहत्यांवर काय परिणाम होतो. कोणीतरी आपल्याच डोळ्यासमोर श्रद्धांजली वाहिली जात असल्याचं पाहणं — यापेक्षा मोठं दु:ख काय असेल?
एकेकाळी आपण बातमी वाचताना, ऐकताना, तिची खातरजमा करत असू. पण आता? कुणी तरी एकाने काहीतरी लिहिलं, की आपण विचार न करता शेअर करतो. आपल्याला ती बातमी खरी आहे का, यापेक्षा “सर्वात आधी मी शेअर केली” हे सांगणं महत्त्वाचं वाटतं. आपण हळूहळू मानवी संवेदना गमावत चाललो आहोत. “लाईक” आणि “शेअर”च्या नशेत आपण माणुसकी विसरत चाललो आहोत.
आपल्याला थांबावं लागेल. प्रत्येक बातमीवर आंधळेपणाने विश्वास ठेवायचं थांबवावं लागेल. कोणाच्या मृत्यूची, कोणाच्या आयुष्याची, कोणाच्या भावनांची खिल्ली उडवणं थांबवावं लागेल. कारण ज्या दिवशी आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल अशीच खोटी बातमी पसरली, त्या दिवशी आपणही या वेदनेचा अर्थ समजू.
अजून वेळ गेली नाही — आपण परत आपली संवेदना जागी करू शकतो. विचारपूर्वक, जबाबदारीने आणि माणुसकीने वागायला सुरुवात केली, तर कदाचित समाज पुन्हा थोडा संवेदनशील बनेल. अन्यथा उद्या कुणी तरी पुन्हा “गेले” म्हणून पोस्ट टाकेल, आणि आपण पुन्हा तीच चूक करू — नकळत, निष्काळजीपणे, असंवेदनशीलपणे.
खरंच विचार करा — आपण कोणत्या समाजाकडे चाललो आहोत? जिथं जिवंत माणसाच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहण्याआधी त्याच्या मृत्यूची बातमी शेअर करणं आपल्याला महत्त्वाचं वाटतंय. जिथं सत्यापेक्षा गॉसिप जास्त वेगानं पसरतंय. जिथं श्रद्धांजलीच्या पोस्ट्सना हजारो लाईक्स मिळतात, पण खरी संवेदना एका मनातही जागी होत नाही.
आपल्याला ठरवायचं आहे — आपण फक्त “शेअर” करणारे यंत्र राहायचं की विचार करणारा माणूस बनायचं? धर्मेंद्रसारख्या व्यक्तींचं योगदान, त्यांचं आयुष्य, त्यांचा आदर राखायचा की त्यांच्या नावावर क्लिक मिळवण्यासाठी त्यांना आधीच निरोप द्यायचा?
जर खरंच आपण माणूस म्हणून जगायचं असेल, तर सुरुवात एकाच गोष्टीपासून करावी लागेल — थांबून विचार करणं. प्रत्येक बातमी, प्रत्येक पोस्ट, प्रत्येक अफवा तपासणं. कारण संवेदना हे काही केवळ शब्द नाहीत, ती माणुसकीची शेवटची शिदोरी आहे. आणि जर ही शिदोरी आपण गमावली, तर मग उरेल काय — फक्त आवाज, गोंधळ आणि रिकामी मने.
विवेक कुलकर्णी
