साठवणीतले गाणे : पुष्प सहावे
“हंगामा है क्यों बरपा…” — बंडखोर शब्द, दरबारीचा गहिरा रंग आणि गुलाम अलींची जादू
रसिकजनहो… आदाब! 🙏🙏
कसे आहात? मस्त ना? मस्तच रहा! 😄
मागच्या आठवड्यात आपण गाण्यांचे कितीतरी प्रकार असतात, हे पाहिले. प्रेम, विरह, भक्ती, करुणा, आनंद, निसर्ग, देशभक्ती… प्रत्येक भावनेसाठी संगीताने स्वतंत्र दालन उघडले आहे. काही गाणी कानाला गोड वाटतात, काही मनाला स्पर्शून जातात, तर काही थेट आपल्या विचारांवर प्रहार करतात.
आजचं गाणं याच तिसऱ्या प्रकारातलं…
थोडंसं बंडखोर… थोडंसं उपरोधिक… आणि पूर्णपणे बेधडक!
रसिकहो, आपण भारतीय खऱ्या अर्थाने सहिष्णू आहोत. संगीतासाठी भाषा, धर्म, प्रांत किंवा देश कधीच अडथळा ठरला नाही. म्हणूनच पाकिस्तानात जन्मलेले मेहदी हसन, गुलाम अली, फरीदा खानम, इक्बाल बानो यांसारखे कलाकार भारतीयांच्या मनातही तितकेच घर करून राहिले.
याच कलाकारांमध्ये एक नाव म्हणजे…
गुलाम अली साहेब!
गझल म्हणजे फक्त मंद गतीने गायलेले प्रेमगीत, असा अनेकांचा गैरसमज असतो. पण खरी गझल ही शब्द, शायरी, सूर आणि भावनांचा विलक्षण संगम असतो. प्रत्येक शेर स्वतंत्र अर्थ सांगतो आणि तरीही संपूर्ण गझल एका विचाराला पुढे घेऊन जात राहते.
गुलाम अली साहेबांची खासियत म्हणजे त्यांनी गझलेला शास्त्रीय संगीताचा आधार देत ती सामान्य रसिकांपर्यंत पोहोचवली. त्यांच्या गायकीतील मुरक्या, हरकती, मींड आणि स्वरांची सहज उधळण ऐकताना शास्त्रीय संगीतही किती सुंदर आणि सहज असू शकतं, याची जाणीव होते.
आजची गझल…
“हंगामा है क्यों बरपा, थोड़ी सी जो पी ली है…”
ही गझल ऐकताना सुरुवातीला ती एखाद्या मद्यप्रेमीची बाजू मांडणारी वाटते.
पण जशी जशी गझल पुढे सरकते, तसं लक्षात येतं की हा माणूस केवळ दारूचं समर्थन करत नाही…
तो समाजाच्या दुटप्पीपणालाच प्रश्न विचारतो आहे.
“डाका तो नहीं डाला… चोरी तो नहीं की है…”
केवढं अचाट धाडस! 😄😄
आपल्या पुराणांमध्येही सुरा आणि सोमरसाचे उल्लेख आढळतात. मात्र त्याचबरोबर संयमाचं महत्त्वही सांगितलं आहे. त्यामुळे दारू असो किंवा कुठलंही व्यसन—ते शेवटी माणसाला अधोगतीकडेच घेऊन जातं.
या लेखातून मद्यपानाचं समर्थन अजिबात नाही.
पण एका श्रेष्ठ शायराने समाजाला विचारलेला प्रश्न समजून घ्यावा, एवढाच या लेखामागचा हेतू आहे.
आतापर्यंतच्या प्रत्येक भागात मी सांगितलं आहे की, माझ्या वडिलांनी आम्हाला कधीच अनावश्यक बंधनं घातली नाहीत. ते खूप वेगळ्या विचारांचे होते.
आजही मला आठवतं…
हट्ट करून मी जवळपास २०० रुपयांना ‘दिल्ली मेड’ टेप रेकॉर्डर आणला होता. आज ही रक्कम फारशी वाटणार नाही; पण १९८५ ते १९९० या काळात ती मोठी गोष्ट होती.
सुरुवातीला घरात भजने, गीतरामायण आणि मराठी भावगीतेच वाजायची.
नंतर माझी गाण्यांची भूक वाढत गेली.
आणि मग सुरू झाल्या बीडच्या फेऱ्या…
दहा रुपयांत दहा-अकरा गाणी जुन्या कॅसेटमध्ये भरून मिळायची.
आजच्या Spotify, YouTube, Gaana किंवा JioSaavnच्या पिढीला हे सांगितलं तर कदाचित एखादी गोष्टच वाटेल.
पण आमच्यासाठी तीच आमची म्युझिक लायब्ररी होती.
पाच रुपयांचं एस.टी.चं तिकीट…
बीड एस.टी. कँटीनमधला वडा-सांबार…
अहो… त्या सांबारची चव अजूनही कुठेच मिळाली नाही. 😞
दोन रुपयांचा सिनेमा…
आणि तरीही पैसे उरायचे!
त्या काळात गाणं मिळवणं हीसुद्धा एक साधना होती.
आकाशवाणीवर एखादी आवडती गझल लागली, की लगेच रिकामी कॅसेट टेपरेकॉर्डरमध्ये टाकायची आणि रेकॉर्डचं बटण दाबायचं.
नाहीतर ती गझल पुन्हा कधी ऐकायला मिळेल, याची शाश्वती नसायची.
मी नुकताच बारावी झालो होतो.
दादांकडून ५० रुपये घेतले.
एकच उद्देश…
“चुपके चुपके रात दिन…” मिळवायचं.
कॅसेट भरताना दुकानदार म्हणाला…
“भाई… ये भी सुन ले…”
आणि त्याने “हंगामा…” भरायला सुरुवात केली.
मी विचारलं…
“इतकं आवडलं का?”
तो म्हणाला…
“तुला नक्की आवडेल.”
किती खरं बोलला होता तो!
घरी आलो…
दादांना ऐकवलं…
दादा काय म्हणाले, ते सांगत नाही… 😄😄
पण त्या दिवशी त्यांनी माझ्या चेहऱ्यावरचं समाधान नक्की पाहिलं होतं.
दादा…
हा शब्द उच्चारला की अजूनही मन भरून येतं.
माझं आयुष्य घडवणारा तो माणूस…
पुनर्जन्मावर माझा फारसा विश्वास नाही.
पण जर तो असेलच…
तर प्रत्येक जन्मी बाप हाच मिळावा…
Love you, दादा…
Miss you a lot… ❤️
या गझलेविषयी एक मनोरंजक गोष्ट…
ही गझल अकबर इलाहाबादी यांनी लिहिली.
राग दरबारी कानडाच्या गंभीर आणि भारदस्त अंगावर तिची चाल उभी आहे.
सुरुवातीला ही गझल पाकिस्तानातील “आप का खादिम” या चित्रपटात मेहदी हसन यांच्या आवाजात आली. मात्र नंतर गुलाम अली साहेबांनी आपल्या अद्वितीय अंदाजात ती सादर केली आणि ती अक्षरशः अमर झाली.
आजही मैफिलीत “हंगामा…” सुरू झाला की रसिक नकळत ताल धरतात.
कारण ही फक्त गझल नाही…
ती समाजाला विचारलेला एक मिश्कील, धारदार आणि बुद्धिमान प्रश्न आहे.
माझ्यासाठी मात्र…
ही गझल म्हणजे बीडचा प्रवास…
एस.टी. कँटीनचं सांबार…
दहा रुपयांची कॅसेट…
दुकानदाराचा विश्वास…
आणि दादांसोबत घालवलेले ते अमूल्य क्षण…
हे सगळं पुन्हा जगण्याचा एक बहाणा आहे.
एकदा निवांत वेळ काढा.
डोळे मिटा.
गुलाम अली साहेबांचा आवाज कानात उतरू द्या.
कदाचित गझल संपेल…
पण तिचा विचार मात्र तुमच्या मनात बराच वेळ घुमत राहील.
पुन्हा भेटू…
“साठवणीतले गाणे”च्या सातव्या पुष्पासह.
तोपर्यंत…
संगीत ऐकत रहा…
आठवणी जपत रहा…
आणि मनाने सदैव रसिक राहा! 🙏🎶
कारण…
“हे सदर गाण्याचं परीक्षण नाही; एका गाण्याने आयुष्यात जपून ठेवलेल्या आठवणींचा हा प्रवास आहे.”
आणि…
“… काही गाणी फक्त ऐकायची नसतात, ती जगायची असतात.”
— विवेक दिगंबरराव कुलकर्णी
