पिंपरी, दि. ८ ऑगस्ट २०२६ : संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या साहित्याने वंचितांच्या वेदनांना आवाज देत समाजजागृतीचे कार्य केले, असे मत काव्यसंमेलनात व्यक्त करण्यात आले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व-२०२६ अंतर्गत भक्ती-शक्ती चौक, निगडी येथील अण्णाभाऊ साठे स्मारक परिसरात ६ ऑगस्ट रोजी निमंत्रित कवींचे काव्यसंमेलन उत्साहात पार पडले.
यावेळी सुनील भिसे, किशोर केदारी, विशाल कसबे, अनिल दीक्षित, सुहास घुमरे, दत्तू ठोकळे, महेंद्र पाटोळे, आत्माराम हारे, संजय साळुंखे, विनोद अष्टूल, पुरुषोत्तम हिंगणकर, विजय कांबळे, देवेंद्र गावंडे, अशोक टाकळे यांच्यासह अनेक कवींनी अण्णाभाऊंच्या जीवनकार्य, साहित्य आणि सामाजिक योगदानावर आधारित कविता सादर केल्या.
‘अण्णाभाऊंची लेखणी’, ‘दीड दिवसाची शाळा’, ‘समता’, ‘अण्णांच्या कवितांना सलाम’, ‘अण्णा ध्रुवतारा’, ‘वालू आईच्या पोटी’, ‘पुतळे रडत राहतील’ आदी रचनांनी काव्यसंमेलनात रंगत आणली.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अण्णाभाऊंचे योगदान, तसेच बेळगाव, कारवार आणि धारवाड महाराष्ट्रात यावीत, ही त्यांच्या ‘माझी मैना गावाकडं राहिली’ या छक्कडमधून व्यक्त झालेली भावना आजही कायम असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
काव्यसंमेलनाचे प्रास्ताविक सुनील भिसे यांनी केले. सूत्रसंचालन किशोर केदारी यांनी केले, तर आभार विशाल कसबे यांनी मानले.
