Home महाराष्ट्र Garbage Segregation:पिंपरी-चिंचवडमध्ये कचरा विलगीकरणासाठी महापालिकेचे जनजागृती अभियान; नागरिकांना चार प्रकारांत कचरा देण्याचे आवाहन

Garbage Segregation:पिंपरी-चिंचवडमध्ये कचरा विलगीकरणासाठी महापालिकेचे जनजागृती अभियान; नागरिकांना चार प्रकारांत कचरा देण्याचे आवाहन

पिंपरी-चिंचवड महापालिकेने कचरा विलगीकरणाबाबत व्यापक जनजागृती अभियान सुरू केले आहे. नागरिकांनी ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य कचरा स्वतंत्रपणे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

by Admin
Spread the love

(पिंपरी, प्रतिनिधी):सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरात कचरा विलगीकरणाबाबत व्यापक जनजागृती अभियान सुरू केले आहे. नागरिकांनी घरातील कचरा ओला, सुका, सॅनिटरी आणि विशेष काळजीयोग्य अशा चार प्रकारांत विलगीकरण करून घंटागाडीला द्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

या अभियानांतर्गत सर्व क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत घरोघरी भेटी देऊन नागरिकांना कचरा विलगीकरणाचे महत्त्व पटवून दिले जात आहे. तसेच विविध भागांत जनजागृती उपक्रम आणि संवादाच्या माध्यमातून योग्य कचरा व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले जात आहे.

महापौर रवि लांडगे म्हणाले, “स्वच्छ आणि पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक घरातून कचऱ्याचे चार प्रकारांत विलगीकरण झाल्यास शहरातील कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम होईल.”

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले की, “स्रोतस्थळी कचरा विलगीकरण हा शाश्वत कचरा व्यवस्थापनाचा पाया आहे. योग्य विलगीकरणामुळे कचरा प्रक्रियेला गती मिळते आणि स्वच्छ शहराचे उद्दिष्ट साध्य करण्यास मदत होते.”

अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांनी नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर भर देत, प्रत्येक प्रभागात जनजागृती अभियान सातत्याने राबविले जात असल्याचे सांगितले.

उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल म्हणाले, “घरातूनच कचऱ्याचे योग्य विलगीकरण केल्यास प्रक्रिया अधिक सुलभ व परिणामकारक होते. पर्यावरण संरक्षण आणि सार्वजनिक आरोग्यासाठी प्रत्येक नागरिकाने कचरा चार प्रकारांत वेगळा करून द्यावा.”

महापालिकेच्या या अभियानाला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक पिंपरी-चिंचवड घडविण्यासाठी कचरा विलगीकरणाची सवय रुजविण्यावर भर दिला जात आहे.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00