(पिंपरी, प्रतिनिधी ): आर्थिक विवंचनेतून एकाच कुटुंबातील तिघांनी विषारी औषध प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना पिंपरीतील अजमेरा परिसरात घडली. या घटनेत पतीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, पत्नी आणि मुलगी यांच्यावर अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. मोरवाडी येथील करिष्मा ग्लोरी सोसायटीमध्ये शनिवारी (१ ऑगस्ट) हा प्रकार उघडकीस (Family Suicide Attempt)आला.
मृत व्यक्तीचे नाव विनोद पिल्लाई (वय ५०) असे असून, त्यांची पत्नी शैलजा पिल्लाई (वय ४५) आणि मुलगी पौर्णिमा पिल्लाई (वय १९) यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
शाळेत संपर्क न झाल्याने प्रकार उघड
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनोद आणि शैलजा पिल्लाई हे दोघेही एका खासगी शाळेत कार्यरत आहेत, तर मुलगी पौर्णिमा ही संगणकशास्त्राची विद्यार्थिनी आहे. शनिवारी शैलजा या नेहमीप्रमाणे शाळेत न पोहोचल्याने शाळा प्रशासनाने त्यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकांना याची माहिती देण्यात आली. नातेवाईकांनी तातडीने घरी जाऊन पाहणी केली असता तिघेही गंभीर अवस्थेत आढळून आले.
रुग्णालयात दाखल; उपचारादरम्यान पतीचा मृत्यू
नातेवाईकांनी नागरिकांच्या मदतीने तिघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान विनोद पिल्लाई यांचा मृत्यू झाला. पत्नी आणि मुलगी यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
सुसाईड नोट जप्त; आर्थिक विवंचनेचा उल्लेख
घटनेची माहिती मिळताच पिंपरी पोलिसांनी घटनास्थळीख धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी पोलिसांना एक सुसाईड नोट आढळून आली. त्यामध्ये आर्थिक विवंचनेमुळे टोकाचे पाऊल उचलत असल्याचा उल्लेख करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पिंपरी पोलीस करत (Family Suicide Attempt)आहेत.
