Home महाराष्ट्र Sathavanitle Gane Part 5:साठवणीतले गाणे भाग 5 : ‘तुझसे नाराज़ नहीं ज़िंदगी’ – गुलजारांच्या शब्दांत आयुष्याचं तत्त्वज्ञान

Sathavanitle Gane Part 5:साठवणीतले गाणे भाग 5 : ‘तुझसे नाराज़ नहीं ज़िंदगी’ – गुलजारांच्या शब्दांत आयुष्याचं तत्त्वज्ञान

'साठवणीतले गाणे' भाग ५ मध्ये गुलजार लिखित आणि 'मासूम' चित्रपटातील 'तुझसे नाराज़ नहीं ज़िंदगी' या अजरामर गीताचा भावपूर्ण प्रवास. वैयक्तिक अनुभव, जीवनातील चढ-उतार आणि या गीतातून मिळालेली जगण्याची प्रेरणा.

by Admin
Spread the love

#साठवणीतलेगाणे :भाग 5 वा

“तुझसे नाराज़ नहीं ज़िंदगी… हैरान हूँ मैं…”

रसिकहो, अदाब…

हिंदी चित्रपटसृष्टीला लाभलेलं केवळ एक सोनेरी नव्हे, तर अक्षरशः दैवी वरदान म्हणजे संपूर्ण सिंग कालरा… आपल्या सगळ्यांचे लाडके गुलजारसाब .

गुलजार म्हणजे फक्त गीतकार नाहीत. ते मानवी भावविश्वाचे भाषांतरकार आहेत. माणसाच्या मनातल्या अशा अनेक भावना, ज्या आपण आयुष्यभर अनुभवतो; पण शब्दांत मांडू शकत नाही, त्या ते सहज कागदावर उतरवतात. त्यांच्या गीतांमध्ये शब्दांची चमक नाही; तर अर्थाची खोली आहे. म्हणूनच त्यांची गाणी ऐकली जात नाहीत… ती जगली(Sathavanitle Gane Part 5) जातात.

त्यांच्या असंख्य अजरामर गीतांपैकी माझ्या मनाच्या सर्वात जवळचं एक गीत म्हणजे…

“तुझसे नाराज़ नहीं ज़िंदगी… हैरान हूँ मैं…”

१९८३ साली आलेला शेखर कपूर यांचा मासूम हा चित्रपट त्या काळासाठी अत्यंत धाडसी विषय हाताळणारा होता. नसीरुद्दीन शाह, शबाना आझमी, शशिकला, बालकलाकार जुगल हंसराज आणि छोट्याशा भूमिकेत उर्मिला मातोंडकर… प्रत्येक कलाकाराने आपल्या अभिनयाने या चित्रपटाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.

भूतकाळात झालेल्या एका चुकीचा वर्तमानातील संसारावर होणारा परिणाम, त्यातून निर्माण होणारे भावनिक संघर्ष आणि नात्यांची होणारी घालमेल… या सगळ्याचं अत्यंत संवेदनशील चित्रण या चित्रपटात आहे.

आणि या कथेला आत्मा मिळतो तो गुलजारांच्या या गीतामुळे.

पहिलीच ओळ…

“तुझसे नाराज़ नहीं ज़िंदगी, हैरान हूँ मैं…”

किती विलक्षण विचार!

गुलजार म्हणत नाहीत की मला आयुष्याचा राग आहे. ते म्हणतात…

“मी तुझ्यावर रागावलेलो नाही, पण तू इतकी गूढ का आहेस, याचं मला आश्चर्य वाटतं.”

राग व्यक्त करता येतो; पण हैराणी माणसाला अंतर्मुख करते.

आयुष्याचं हेच तर वैशिष्ट्य आहे. कालपर्यंत सर्व काही आपल्या मनासारखं चाललेलं असतं आणि एका क्षणात सगळं बदलून जातं. मग मनात प्रश्नांची गर्दी होते; पण उत्तरं कुठेच सापडत नाहीत.

त्यानंतरची ओळ…

“तेरे मासूम सवालों से परेशान हूँ मैं…”

आयुष्याचे प्रश्न खूप निरागस असतात; पण त्यांची उत्तरं फार कठीण असतात.

चांगल्या माणसांनाच दुःख जास्त का?

ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं, तोच दूर का जातो?

स्वप्नं पूर्ण होत असतानाच ती अचानक का तुटतात?

हे प्रश्न साधे वाटतात; पण त्यांची उत्तरं शोधताना अख्खं आयुष्य निघून जातं.

या गाण्याशी माझं नातंही काहीसं असंच आहे.

पाडळीसारख्या छोट्याशा गावातून पुण्यासारख्या शहरात आलो. अनुभव नव्हता, भांडवल नव्हतं; पण कष्ट करण्याची तयारी होती. देवाच्या कृपेने व्यवसाय सुरू झाला आणि अपेक्षेपेक्षा कितीतरी मोठं यश मिळालं. जणू हात लावीन तिथे सोनं होत होतं.

पण…

कधी कधी नशिबालाही नजर लागते.

या गाण्याशी माझं नातंही काहीसं असंच आहे.
पाडळीसारख्या छोट्याशा गावातून पुण्यासारख्या शहरात आलो. अनुभव नव्हता, भांडवल नव्हतं; पण कष्ट करण्याची तयारी होती. देवाच्या कृपेने व्यवसाय सुरू झाला आणि अपेक्षेपेक्षा कितीतरी मोठं यश मिळालं. जणू हात लावीन तिथे सोनं होत होतं.
पण…
कधी कधी नशिबालाही नजर लागते.
सुरुवातीला व्यवसाय डळमळला आणि अखेर हातातून निसटला.
ते दुःख पचवायच्या आतच आयुष्याने आणखी एक मोठा आघात केला.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर माझी पत्नी आणि माझा लहान मुलगा प्रवास करत होते. गाडी घसरली… काही क्षणांसाठी सर्व काही संपल्यासारखं वाटलं. आजही तो प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो. पण त्या दिवशी नियतीने अजून साथ सोडली नव्हती. केवळ आणि केवळ नशिबाने दोघेही सुखरूप वाचले.
मात्र त्यानंतर जणू दुःखाची अखंड मालिका सुरू झाली.
एक संकट संपायच्या आत दुसरं दार ठोठावत उभं असायचं.
एकेकाळी जिथे आयुष्याने भरभरून सोनं दिलं होतं, तिथे आता जणू शेणच वाट्याला येत होतं.
त्यात जगानेही आपला खरा चेहरा दाखवला.
सुखात भोवती असणारी कितीतरी माणसं नकळत दूर गेली. काहींनी साथ सोडली, काहींनी तमाशा पाहिला, तर काहींनी जखमांवर फुंकर घालण्याऐवजी मीठ चोळलं.
अशा वेळी मन पूर्णपणे विषण्ण व्हायचं.
पण प्रत्येक वेळी नकळत कानात तेच शब्द घुमायचे…
“तुझसे नाराज़ नहीं ज़िंदगी… हैरान हूँ मैं…”
मला फक्त एका गोष्टीवर विश्वास होता…
सुख कायम राहत नाही…
म्हणून दुःखही कायम राहणार नाही.
काळ पुढे सरकत राहतो.
जखमा भरतात.
आठवणी मात्र राहतात.
आज सगळं पूर्वीसारखं झालं आहे, असं मी म्हणणार नाही.
काही जखमा आयुष्यभर सोबत राहतात.
पण त्या वेदनेची तीव्रता मात्र कमी होते.
वाईट काळ अखेर निघून जातो.
आणि आजही जेव्हा या गीतातली ती ओळ कानावर पडते…
“आज अगर भर आई है, बूंदें बरस जाएगी…”
तेव्हा नकळत डोळ्यांत पाणी दाटून येतं.
कारण काही अश्रूंना कारण नसतं…
ते फक्त आठवणींचे असतात.
आणि म्हणूनच हे गीत माझ्या मनात नाही…
ते माझ्या काळजात कायमचं घर करून बसलं आहे.

दुकान गेलं.

सगळं विस्कटलं.

आणि नकळत ओठांवर आले…

“जीने के लिए सोचा ही नहीं, दर्द संभालने होंगे…”

काय अफाट तत्त्वज्ञान आहे या एका ओळीत!

आपण व्यवसायाचं नियोजन करतो.

घराचं नियोजन करतो.

मुलांच्या भविष्याचं नियोजन करतो.

पण आयुष्यात कधीतरी दुःखही पेलावं लागेल, याची तयारी मात्र करत नाही.

आणि म्हणूनच संकट आलं की माणूस कोसळतो.

पुढची ओळ तर थेट काळजालाच हात घालते…

“मुस्कुराये तो मुस्कुराने के कर्ज़ उतारने होंगे…”

आणि लगेच…

“मुस्कुराऊँ कभी तो लगता है, जैसे होंठों पे कर्ज़ रखा है…”

ही माझ्या मते हिंदी चित्रपटसंगीतातील सर्वश्रेष्ठ ओळींपैकी एक आहे.

किती वेळा आपण हसतो…

पण ते हसू आपल्या आनंदाचं नसतं.

समोरच्याला काळजी वाटू नये म्हणून आपण हसत राहतो.

जबाबदाऱ्या निभावत राहतो.

मन आतून तुटत असतं; पण चेहऱ्यावर हसू ठेवावंच लागतं.

अशा वेळी खरंच वाटतं…

हसूसुद्धा जणू कर्ज घेऊनच चेहऱ्यावर आणलं आहे.

आणि मग येतो माझ्या मते या गीताचा सर्वात हळवा अंतरा…

“आज अगर भर आई है, बूंदें बरस जाएगी…”

गुलजार जणू सांगतात…

रडू दाबून ठेवू नका.

अश्रू म्हणजे कमकुवतपणा नाही.

ते मन अजून जिवंत असल्याची साक्ष आहेत.

आणि त्यानंतर…

“कल क्या पता किनके लिये आँखें तरस जाएगी…”

अरे…

याहून मोठं आयुष्याचं तत्त्वज्ञान काय असू शकतं?

आज जी माणसं आपल्या जवळ आहेत, ती उद्याही असतील याची कोणतीच खात्री नाही.

म्हणून प्रेम व्यक्त करायला…

माफी मागायला…

आणि माणसं जपायला…

उशीर करू नये.

गुलजार यांचं वैशिष्ट्य हेच.

ते कधी उपदेश करत नाहीत.

ते बोट दाखवत नाहीत.

ते फक्त एक प्रसंग, एक भावना किंवा एक प्रश्न आपल्या हातात ठेवतात.

उत्तर शोधण्याची जबाबदारी मात्र आपल्यावर सोडून देतात.

म्हणूनच त्यांची गाणी प्रत्येक वयात वेगळा अर्थ देतात.

वीसाव्या वर्षी हे गीत वेगळं वाटतं…

चाळिशीत त्याचा अर्थ बदलतो…

आणि साठीनंतर तर ते आयुष्याचंच आत्मचरित्र वाटायला लागतं.

या गीताला पंचमदा अर्थात राहुल देव बर्मन यांनी अतिशय संयत आणि शब्दांना न्याय देणारं संगीत दिलं आहे. स्त्रीस्वरात भारतरत्न लता मंगेशकर आणि पुरुषस्वरात अनुप घोषाल यांनी हे गीत अक्षरशः अमर केलं आहे.

लतादीदींच्या आवाजात आईची माया आहे.

अनुप घोषाल यांच्या स्वरात आयुष्याने थकलेल्या माणसाची शांत वेदना आहे.

दोन्ही आवृत्त्या म्हणजे भावविश्वाच्या दोन वेगळ्या छटा.

आजही हे गाणं ऐकताना मी केवळ श्रोता राहत नाही…

मी त्या गीताचाच एक भाग बनून जातो.

आयुष्यात मिळालेलं यश…

आलेले अपयश…

भेटलेली माणसं…

निसटून गेलेले क्षण…

डोळ्यांत साचलेले अश्रू…

आणि नकळत ओठांवर उमटलेलं हसू…

सगळंच पुन्हा एकदा समोर उभं राहतं.

म्हणूनच काही गाणी काळाच्या पलीकडे जातात.

ती कधीच जुनी होत नाहीत.

कारण माणसाचं मन कधीच जुनं होत नाही.

आणि जोपर्यंत माणूस आनंद, वेदना, आशा, विरह, प्रेम आणि हुरहूर अनुभवत राहील, तोपर्यंत “तुझसे नाराज़ नहीं ज़िंदगी…” हे गीत प्रत्येक पिढीला स्वतःची गोष्ट सांगत राहील.

गुलजार साहेब…

तुम्हाला शब्दांचा जादूगार म्हणणंही अपुरं आहे.

तुम्ही शब्दांना आत्मा दिलात.

मनापासून(Sathavanitle Gane Part 5) सलाम! 🙏

विवेक दिगंबरराव कुलकर्णी 

 

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00