प्रतिनिधी :राज्यातील इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले असून, इयत्ता दहावीची परीक्षा दि. २० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ या कालावधीत, तर इयत्ता बारावीची परीक्षा दि. १० फेब्रुवारी ते १८ मार्च २०२६ दरम्यान होणार असल्याची माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी (Board Exam) दिली.
राज्यभरातून दहावीच्या परीक्षेसाठी आतापर्यंत १६ लाख १४ हजार ९८७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, ऑनलाईन अर्जांची मुदत अद्याप सुरू असल्याने ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. दहावीची परीक्षा राज्यातील ५ हजार १११ परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार (Board Exam) दिली. तर बारावीच्या परीक्षेसाठी १५ लाख ३२ हजार ८६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, राज्यातील ३ हजार ३८७ परीक्षा केंद्रांवर परीक्षाहोणार आहे.
परीक्षा भयमुक्त व कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी यंदा कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. एकूण ८० टक्के परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून, उर्वरित केंद्रांवर तातडीने कॅमेरे बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर कंट्रोल रूमद्वारे थेट देखरेख ठेवण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तर व राज्यस्तरावर दक्षता समित्या कार्यरत राहणार आहेत.
दरम्यान, मागील वर्षी बारावीच्या ७६ आणि दहावीच्या ३१ परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार आढळून आल्याने त्या केंद्रांची मान्यता रद्द करण्यात आली होती. यंदाही गैरप्रकार आढळल्यास संबंधित परीक्षा केंद्रांची मान्यता तात्काळ रद्द करण्यात येईल, असा इशाराही शिक्षण विभागाने दिला
यावेळी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी आणि माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर उपस्थित होते.
तसेच, येत्या २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी राज्यातील सर्व शाळांमध्ये “राष्ट्र प्रथम” या संकल्पनेवर आधारित देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमात राज्यातील सुमारे १ लाख शाळा, ७ लाखांहून अधिक शिक्षक आणि सुमारे २ कोटी विद्यार्थी सहभागी होणार असून, शासकीय ध्वजवंदनानंतर किमान २० मिनिटांचा सामूहिक कवायत संचलन कार्यक्रम घेण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत
