प्रतिनिधी :मुळशी तालुक्यातील भुकूम रोडवर दुचाकीचा बुलेट मोटारसायकलला धक्का लागल्याच्या कारणावरून तब्बल १४ जणांच्या टोळक्याने एका कुटुंबावर हल्ला चढवला. त्यांनी फिर्यादी आणि त्यांच्या घरच्यांना मारहाण केली तसेच दगडफेक करून घराच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. या प्रकरणात २७ वर्षीय तरुणाने बावधन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून सर्व १४ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, भुकूम येथे सार्वजनिक रस्त्यावर फिर्यादीच्या दुचाकीचा सौम्य धक्का आरोपींच्या बुलेटला लागला. या घटनेवरून दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. संतापलेल्या आरोपींनी आपल्या साथीदारांना बोलावून फिर्यादीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांनी फिर्यादीच्या घरावर दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडल्या. या प्रकरणाचा तपास बावधन पोलीस करत आहेत.
