पिंपरी (१६ नोव्हेंबर २०२५) : बालदिनानिमित्त स्वरोपासना म्युझिक अकॅडमीच्या वतीने आयोजित ‘गीत फुलोरा’ या गेय कवितांच्या विशेष कार्यक्रमाला रहाटणी येथील एस. एन. बी. पी. इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला. मुख्याध्यापिका जयश्री वेंकटरामन, उपमुख्याध्यापिका लक्ष्मी जी यांच्यासह मधुमिता देव, हेमराज थापा, विजय नेलगे, सोनल श्रीवास्तव आदी शिक्षक आणि अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वरोपासनाच्या वाकड–कस्पटेवस्ती आणि पुनावळे–काटेवस्ती शाखांमधील संगीत विद्यार्थी ओंकार कुलकर्णी, आर्यन पावसे, प्रिया जोशी, वीरा सुरते, राजश्री पटेल आणि अश्वि नाकाडे यांनी अभयार्पिता निर्मित ‘गीत फुलोरा’ मधील मराठी गेय कवितांचे मनोहारी सादरीकरण केले. ‘शाळा’, ‘माझ्या मराठीची गोडी’, ‘आई’, ‘चांदोमामा’, ‘आर्जव’, ‘पाहुणचार’, ‘या बालांनो या रे या’, ‘एक झाड लावू’ अशा अनेक कविता त्यांनी सुरेलपणे गायल्या. त्यांच्या सादरीकरणाने सुरुवातीला प्रेक्षक म्हणून बसलेले विद्यार्थी व शिक्षकही आनंदाने ठेका धरीत गाण्यांत सामील झाले.
वाद्यवृंदाची प्रभावी साथ अर्जुन नेटके, वंशराज वरखेडे, विकास शिंदे, आलोक पाटोळे, नयन शिवरकर आणि आर्यन पावसे यांनी दिली. अथर्व कुलकर्णी आणि भाग्यदा कुलकर्णी यांनी कवितांची निवड आणि त्यांना अनुरूप चाली तयार करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
‘गीत फुलोरा’ या उपक्रमाबाबत माहिती देताना स्वरोपासनाचे अभय कुलकर्णी आणि अर्चना कुलकर्णी म्हणाले की, २००४ पासून शाळांमध्ये हा शैक्षणिक उपक्रम राबवला जात आहे. इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांनाही मराठी कवितांबद्दल प्रेम निर्माण व्हावे, यासाठी मागील एकवीस वर्षांपासून विविध शाळांमध्ये हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. माध्यम काहीही असले तरी गेय कविता आणि त्यांच्या सुरेल चालींमुळे विद्यार्थी–शिक्षक दोघेही या कार्यक्रमात रमून जातात.
