(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी ): मोशी कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारत दुर्घटनेत मृत्यू झालेल्या नऊ कामगारांच्या कुटुंबीयांसाठी आर्थिक मदत आणि पुनर्वसनाचे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. प्रत्येक कुटुंबाला एकूण ५५ लाख रुपयांची मदत मिळणार (Pcmc Garbage Depot)आहे.
यामध्ये संबंधित कंत्राटदार अँटोनी लारा रिन्युव्हेबल एनर्जी कंपनीकडून विम्यासह ४० लाख, पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून १० लाख आणि राज्य शासनाकडून पाच लाख रुपयांचा समावेश आहे. याबाबतची माहिती सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे आणि कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मृत कामगारांच्या कुटुंबातील एका सदस्याला कंपनीत कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले असून, ऑगस्टपासून संबंधित व्यक्तीचा पगार सुरू करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच मृत कामगारांच्या मुलांच्या पदवी व उच्च शिक्षणाचा खर्च कंपनीकडून करण्यात येणार आहे.
मृत कामगारांचे आई-वडील, पत्नी आणि मुलांना कंपनीकडून आरोग्य विमा कवच देण्यात येणार आहे. तसेच महापालिकेच्या नियमानुसार कुटुंबातील एका सदस्याला नोकरी आणि घर देण्यासाठी महासभेच्या मान्यतेनंतर राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
दरम्यान, दुर्घटनेनंतर कुटुंबीयांनी एक कोटी रुपयांची मदत, महापालिकेत नोकरी आणि घराची मागणी केली होती. मृत नऊ कामगारांपैकी पाच कंपनीच्या थेट सेवेत, तीन कंत्राटी पद्धतीने, तर एक चालक म्हणून कार्यरत होता. महापालिकेतील नोकरी व घरासाठी पुढील प्रशासकीय प्रक्रिया आवश्यक राहणार (Pcmc Garbage Depot)आहे.
