(पिंपरी-चिंचवड, प्रतिनिधी ): शहरातील बीआरटी (Bus Rapid Transit) व्यवस्था गेल्या दीड दशकाहून अधिक काळ वाहतूक कोंडी कमी करण्यात अपयशी ठरली असून, ती टप्प्याटप्प्याने बंद करून पारंपरिक बससेवा अधिक सक्षम करण्याबरोबरच मेट्रोच्या विस्ताराला प्राधान्य द्यावे, अशी मागणी शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा चिंचवड रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रो. राजेश आगरवाल यांनी केली (Pimpri Chinchwad BRT)आहे.
आगरवाल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीआरटीचा मूळ उद्देश खासगी वाहनधारकांना सार्वजनिक वाहतुकीकडे वळविणे हा होता. मात्र पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये हा उद्देश अपेक्षित प्रमाणात साध्य झालेला नाही. गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिक बीआरटीपूर्वीपासूनच बससेवेचा वापर करत होते, तर खासगी वाहनधारकांना बीआरटीकडे आकर्षित करण्यात ही व्यवस्था अपयशी ठरली आहे. त्याउलट मेट्रो सुरू झाल्यानंतर अनेक नागरिकांनी खासगी वाहनांऐवजी मेट्रोचा पर्याय स्वीकारला आहे, असा दावा त्यांनी केला.
पुण्यातील विमाननगर परिसरातून बीआरटी हटवल्यानंतर तेथील वाहतूक कोंडी कमी झाल्याचा दावा करत पुणे महापालिकेनेही बीआरटी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्येही अशाच प्रकारे बीआरटी व्यवस्थेचा फेरविचार करण्याची गरज असल्याचे आगरवाल यांनी नमूद केले.
त्यांच्या मते, बीआरटी मार्गांमुळे सर्वसाधारण वाहनांसाठी उपलब्ध रस्त्याची रुंदी कमी होते. मध्यभागी असलेल्या बसस्थानकांमुळे पादचाऱ्यांसाठी वारंवार गतिरोधक उभारावे लागतात, परिणामी वाहतुकीचा वेग कमी होऊन कोंडी वाढते. तसेच मालवाहतुकीसाठी लागणारा वेळ वाढल्याने उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमधील लॉजिस्टिक खर्चावरही परिणाम होत असल्याचा दावा त्यांनी केला.
बीआरटी व्यवस्थेवरील खर्च कमी करून तो आधुनिक, स्वच्छ, वातानुकूलित आणि परवडणाऱ्या बससेवेसाठी वापरावा. त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर आणखी वाढेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
पिंपरी ते स्वारगेट या मार्गावर नियमित मेट्रो सेवा उपलब्ध असल्याने या मार्गावरील बीआरटीची आवश्यकता नव्याने तपासण्याची गरज आहे. बदलत्या काळानुसार शहराच्या वाहतूक व्यवस्थेतही बदल होणे आवश्यक असून, बीआरटीऐवजी मेट्रोच्या विस्ताराला प्राधान्य देण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील नवनिर्वाचित नगरसेवक, स्थानिक आमदार आणि खासदार यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी रो. राजेश आगरवाल यांनी केली (Pimpri Chinchwad BRT)आहे.
