पिंपरी, दि. ६ फेब्रुवारी –प्रभाग क्रमांक १६ मधील किवळे, मामुर्डी व विकासनगर परिसरात रखडलेली विकासकामे तातडीने सुरू करण्याची मागणी नगरसेविका सौ. ऐश्वर्या राजेंद्र तरस यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात रस्ते विकास, ड्रेनेज लाईन, नाले बांधणी तसेच स्मशानभूमी व सांस्कृतिक सभागृहाच्या कामांचा समावेश आहे. किवळे–मामुर्डी भागातील विविध ठिकाणी १२ ते १८ मीटर रुंदीचे डी.पी. रस्ते विकसित करणे, विकासनगर व साईनगर परिसरातील अंतर्गत रस्ते सुधारणे, तसेच नाले बांधून पावसाळ्यातील पाणी साचण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय मामुर्डी व किवळे येथील स्मशानभूमीचा विकास, तसेच एमिनिटी स्पेसमध्ये प्रस्तावित सांस्कृतिक सभागृहाचे काम तातडीने हाती घेण्याची विनंतीही करण्यात आली आहे. नागरिकांच्या दैनंदिन अडचणी लक्षात घेता सर्व कामे त्वरित मार्गी लावावीत, अशी अपेक्षा या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.


