(पिंपरी चिंचवड, प्रतिनिधी ता. ३) : जीवनात कधीही न्यूनगंड बाळगू नका किंवा अपयशाची भीती मनात ठेवू नका. सातत्याने प्रयत्नशील राहा, धाडसी बना आणि प्रत्येक काम पूर्ण क्षमतेने, समर्पण भावनेने व सकारात्मक विचाराने करा. असे केल्यास यश निश्चित मिळते, असा प्रेरणादायी संदेश प्रसिद्ध मराठी अभिनेते सिद्धार्थ जाधव यांनी तरुणांना(Actor Siddharth Jadhav) दिला.
चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि दिशा सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सिद्धार्थ जाधवशी दिलखुलास गप्पा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. सुमारे दीड तास चाललेल्या या संवादात्मक कार्यक्रमात सिद्धार्थ जाधव यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांच्या विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली.
यावेळी प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे, दिशा सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब जवळकर यांच्यासह राजेंद्र करपे, गोरख भालेकर, सचिन साठे, नाना शिवले, संतोष बाबर, अविनाश ववले, नंदकुमार कांबळे, संतोष चांदेरे आदी उपस्थित होते.
सिद्धार्थ जाधव म्हणाले, “मलाही माझ्या दिसण्याबाबत न्यूनगंड होता. मात्र, सर्वप्रथम स्वतःला स्वीकारणे आणि स्वतःवर प्रेम करणे महत्त्वाचे आहे. माझ्यासाठी माझा ‘आरसा’ही प्रेरणादायी आहे. प्रत्येकाने स्वतःच्या क्षमता ओळखल्या पाहिजेत. कोणतेही काम करताना पूर्ण समर्पणाने आणि सर्वस्व झोकून देऊन काम केले, तर यश तुमच्यापासून दूर राहणार नाही. दुसऱ्यांच्या अपेक्षांनुसार जगण्यापेक्षा स्वतःच्या ध्येयाशी प्रामाणिक राहणे अधिक महत्त्वाचे(Actor Siddharth Jadhav) आहे.”
ते पुढे म्हणाले, “जगात आई-वडील हेच आपले खरे ‘बेस्ट फ्रेंड’ असतात. त्यांना कधीही भावनिक ब्लॅकमेल करू नका. त्यांच्याशी नेहमी आदराने संवाद साधा. माझे आई-वडील माझ्यासाठी कायम प्रेरणास्थान राहिले आहेत. महाराष्ट्र शासनाने मला व्यसनमुक्तीचा ‘ब्रँड ॲम्बेसेडर’ म्हणून नियुक्त केले, तो माझ्यावर झालेल्या संस्कारांचा आणि माझ्या आई-वडिलांचा सन्मान असल्याचे मी मानतो.”
प्रत्येक क्षेत्रात अपयश येत असते; मात्र ते कायमस्वरूपी नसते. अपयशाने खचून न जाता त्यातून शिकत पुढे जाणे गरजेचे आहे. दारू, सिगारेटसारख्या व्यसनांपासून दूर राहा आणि कोणत्याही परिस्थितीत नैराश्यात जाऊन आत्महत्येचा विचार करू नका, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
“रूप आणि सौंदर्य क्षणभंगुर असते; मात्र कर्तृत्व कायम स्मरणात राहते. मला एफटीआयआय किंवा ललित कला केंद्रात प्रवेश मिळाला नाही. मला द्रोणाचार्य लाभले नाहीत; पण अनुभवाच्या बळावर मी ‘एकलव्य’ होण्याचा प्रयत्न केला,” अशा शब्दांत त्यांनी आपल्या संघर्षमय प्रवासाचा उल्लेख केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाना शिवले यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रवींद्र निरगुडे यांनी, तर आभार प्रदर्शन सुरेखा कुंभार यांनी केले.
महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना “माणूस” म्हणायचे का?
यावेळी सिद्धार्थ जाधव यांनी त्यांच्या ‘ॲनिमल’ या नाटकातील काही संवाद आणि प्रसंग सादर केले. त्यानंतर बोलताना ते म्हणाले, “आई-वडील आणि गुरुजन आपल्यावर संस्कार करतात. तरीही काही जण मानवजन्म मिळूनही जनावरांसारखे वागतात. चार वर्षांच्या चिमुरडीपासून ते वृद्ध महिलांपर्यंत अत्याचार करणाऱ्यांना ‘माणूस’ म्हणायचे का?” असा परखड सवाल त्यांनी उपस्थित केला.
‘ॲनिमल’ या नाटकातून अशाच ज्वलंत सामाजिक विषयावर प्रेक्षकांना आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारा आशय मांडण्यात आला आहे. हे नाटक प्रत्येकाने सहकुटुंब पाहून त्यातून बोध घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
रौप्यमहोत्सवी वर्षात मागे वळून पाहताना…
चित्रपटसृष्टीतील माझ्या कारकिर्दीचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. मागे वळून पाहताना उराशी बाळगलेली अनेक स्वप्ने पूर्ण झाल्याचे समाधान वाटते, असे सिद्धार्थ जाधव यांनी सांगितले.
“माझे वडील मुंबई महानगरपालिकेत नोकरीला होते. मुंबईत स्वतःचे घर घेणे हे एकेकाळी दिवास्वप्न वाटायचे. मात्र, अथक परिश्रमांच्या जोरावर वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी वडिलांच्या ‘रामचंद्र जाधव’ या नावाची पाटी स्वतःच्या घरावर लावण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यानंतर ‘ताराराम’ या नावाने निर्मिती संस्था स्थापन करून ‘ॲनिमल’ या नाटकाची निर्मिती केली,” असे त्यांनी (Actor Siddharth Jadhav )सांगितले.
भरत जाधव, केदार शिंदे, अंकुश चौधरी, महेश मांजरेकर, अमित भंडारी तसेच अनेक मित्र, सहकारी आणि दिग्दर्शक यांचे माझ्या आयुष्यात मोलाचे योगदान आहे. प्रत्येकाकडून काही ना काही शिकायला मिळाले आणि त्यातूनच माझा कलाकार म्हणून प्रवास घडत गेला, अशा भावना सिद्धार्थ जाधव यांनी व्यक्त (Actor Siddharth Jadhav)केल्या.
