प्रतिनिधी :पुण्यातील नवले पुलाजवळ (Navle Bridge) रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दोन कंटेनर आणि एका कारचा सहभाग होता. धडक इतकी तीव्र होती की क्षणात कारला आग लागली आणि काही वाहनं जळून खाक झाली. या दुर्घटनेत किमान सात जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, २० हून अधिक जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, नवले पुलाजवळ दोन कंटेनर एकमेकांना जोरदार धडकले आणि मध्ये असलेली कार त्या दरम्यान अडकली. काही क्षणांतच कारला भीषण आग लागली. या कारमध्ये एक कुटुंब प्रवास करत असल्याची माहिती मिळाली आहे. धडक इतकी जबरदस्त होती की आसपास उभ्या असलेल्या तीन ते चार वाहनांनाही आग लागली. परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
अपघाताची माहिती मिळताच पुणे शहर पोलीस, पीएमआरडीए, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका ताफा त्वरित घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असून, सर्व जखमींना जवळील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या घटनेमुळे पुणे–बंगळुरू महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी तत्काळ रस्त्यावरील वाहतूक वळवून मदत व बचाव कार्य सुरू केले.
स्थानिक नागरिकांच्या मते, नवले ब्रिज परिसरात यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत. मोठ्या कंटेनरची वाहतूक, वेगावर नियंत्रण नसणे आणि रस्त्याची घसरपट्टी हे घटक वारंवार अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. नागरिकांनी या भागात कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा एकदा केली आहे.
ही घटना पुन्हा एकदा नवले पुलाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणत असून, वाहतूक विभागाने तातडीने ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
