पिंपरी (दि. ३० एप्रिल २०२६) : आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला दिलासा संस्था आणि पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीच्या वतीने कष्टकरी कामगारांना ‘मानवी दिलासा पुरस्कार’ प्रदान करून त्यांच्या प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन सन्मानित करण्यात (Dilasa Award) आले.

यामध्ये चर्मकार दांपत्य धोंडीबा लक्ष्मण वाघमारे व कस्तुरा वाघमारे, लोहार दांपत्य राजू काळूराम पवार व शालन पवार तसेच सांगवी स्मशानभूमी सेवक रवींद्र नारायण डोळस यांचा समावेश होता. पुरस्कारार्थींना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि अर्थसाहाय्य देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक, पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीचे अध्यक्ष प्रकाश घोरपडे, जयश्री गुमास्ते, अरुण परदेशी, मुरलीधर दळवी, शामराव सरकाळे, शाम बारसे हे सदस्य उपस्थित होते.
यावेळी पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समितीचे अध्यक्ष प्रकाश घोरपडे म्हणाले, ‘ऊन, वारा, थंडी, पाऊस याची तमा न बाळगता दररोज हे कष्टकरी कामगार ‘जनसेवा हीच खरी ईश्वरसेवा!’ हे ब्रीद उराशी बाळगून काम करीत असतात. या कष्टकरी कामगारांचा यथोचित सन्मान करताना दोन्ही संस्थांना अत्यानंद झाला आहे!’
नामदेव घाटणे, सोमनाथ राऊत, राम कांबळे, अशोक वाघमारे, सुनीता कांबळे, अनिता कांबळे, लक्ष्मण वाघमारे, सुभाष घाटणे गणपती घाटणे, दिनेश नाईकनवरे ही सन्मानार्थी यांची कौटुंबिक माणसे यावेळी उपस्थित होती.

यावेळी समितीचे अध्यक्ष प्रकाश घोरपडे यांनी कष्टकरी कामगारांचे योगदान अधोरेखित करताना, प्रतिकूल परिस्थितीतही ‘जनसेवा हीच ईश्वरसेवा’ या भावनेतून ते कार्यरत असल्याचे सांगितले. कार्यक्रमास दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांच्यासह विविध पदाधिकारी व सदस्य उपस्थित (Dilasa Award)होते.मुरलीधर दळवी यांनी आभार मानले.
