थेरगाव, दि. २२ जून : गणेशनगर येथील लोकमान्य टिळक माध्यमिक विद्यालयात ‘संकल्प दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या बलिदानाची आणि त्यांच्या क्रांतिकारी विचारांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले (Sankalp Din)होते.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लेखक सुभाष चव्हाण यांनी चापेकर बंधूंच्या बलिदानाचे महत्त्व, रँडवधामागील ऐतिहासिक पार्श्वभूमी तसेच देशप्रेम, पर्यावरण संवर्धन, वाहतूक नियमांचे पालन आणि प्लास्टिकमुक्ती याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘५१ क्रांतिकारकांचा आत्मयज्ञ’ या त्यांच्या लेखनाचा उल्लेख करत त्यांनी आदिवासी क्रांतिकारकांचीही माहिती दिली. तसेच विद्यालयाच्या ग्रंथालयाला पुस्तकांची भेट देत ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश (Sankalp Din) दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय कु. सारिका देसाई यांनी करून दिला. इयत्ता नववी ‘क’ मधील कु. माधुरी लोहार हिने चापेकर बंधूंच्या जीवनकार्याची माहिती सादर केली. पोळ दादा यांनी स्वच्छतेवरील गीत, सौ. अंजली सुमंत यांनी चापेकर स्तवन, तर सौ. अश्विनी बाविस्कर यांनी ‘वंद्य वंदे मातरम्’ हे गीत सादर(Sankalp Din) केले.
प्रभारी मुख्याध्यापिका सौ. सुनिता घोडे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, शिस्त आणि १०० टक्के उपस्थितीचा संकल्प करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. कौशल्या कीर्तने यांनी केले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग (Sankalp Din)नोंदविला.
