(चिंचवड, प्रतिनिधी ): पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण ९९ टक्के भरले असून, पाण्याची वाढती आवक लक्षात घेता आज (३ ऑगस्ट) सकाळी १० वाजल्यापासून नदीपात्रात १०,००० क्युसेक वेगाने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास हा विसर्ग टप्प्याटप्प्याने १५,००० क्युसेकपर्यंत वाढविण्यात येऊ शकतो, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली (Pawana Dam Updates)आहे.
खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता तथा पवना धरण प्रकल्पाच्या पूर नियंत्रण कक्षाने पवना नदीकाठच्या ग्रामस्थ, शेतकरी, लाभधारक व नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांनी शेतीची अवजारे, कृषी पंप, पशुधन व इतर साहित्य तातडीने सुरक्षित स्थळी हलवावे. नदी, ओढे व नाल्यांमध्ये पाण्याची पातळी अचानक वाढू शकते, त्यामुळे नदीपात्रात जाणे टाळावे. तसेच अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
धरणातून होणाऱ्या विसर्गाबाबत पुढील माहिती जलसंपदा विभागाकडून वेळोवेळी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे पूर नियंत्रण कक्षाने स्पष्ट केले (Pawana Dam Updates)आहे.


