साठवणीतली गाणी भाग 10 वा
रसिकजन हो, आदाब! 🙏कसे आहात?
बघता बघता आपल्या ‘साठवणीतले गाणे’ या सदराचा आजचा हा दहावा भाग आला देखील! 😄 खरं सांगायचं तर या लेखमालेचे सगळे श्रेय तुम्हालाच द्यायला हवे. तुमच्या प्रेमामुळे, प्रतिसादामुळे आणि जुन्या गाण्यांच्या आठवणींना दिलेल्या दादेमुळे हा प्रवास सुरू आहे आणि दिवसेंदिवस अधिकच रंगत चालला (Marathi Nostalgic Songs)आहे.
या मालिकेत आपण आतापर्यंत गाण्यांचे कितीतरी रंग अनुभवले. देशभक्ती, प्रेम, विरह, भावदुःख, गझल, पोवाडा, सूफी, गवळण… न जाणो किती प्रकार! प्रत्येक गाण्याची आपली एक वेगळीच दुनिया असते. एखादे गाणे मनाला हळुवार स्पर्श करते, एखादे जुन्या आठवणी जाग्या करते, तर एखादे गाणे आपल्याला नकळत बालपणात घेऊन (Marathi Nostalgic Songs)जाते.
आजचे गाणेही असेच आहे.
‘तुझ्या गळा, माझ्या गळा,
गुंफू मोत्यांच्या माळा…’
या गाण्यात काहीशी खोडकर वृत्ती आहे. बालगीत म्हणा, लोकगीत म्हणा, बडबडगीत म्हणा किंवा भावा-बहिणीच्या निरागस नात्यातला गोड संवाद म्हणा… हे गाणे कुठल्याही एका चौकटीत सहज बसत (Marathi Nostalgic Songs)नाही.
“ताई, आणखी कोणाला?”
“चल रे दादा चहाटळा!”
“तुज कंठी, मज अंगठी!
आणखी गोफ कोणाला?”
“वेड लागले दादाला!”
“मला कुणाचे? ताईला!”
असा हा संवाद पुढे जातो आणि प्रत्येक ओळीत भावा-बहिणीच्या नात्यातली निरागस गंमत दिसत(Marathi Nostalgic Songs) राहते.
“तुज पगडी, मज चिरडी!
आणखी शेला कोणाला?”
“दादा, सांगू बाबांला?”
“सांग तिकडच्या स्वारीला!”
किती गोड आहे ना हे?
एकमेकांची चेष्टा करायची, थोडे रुसायचे, पुन्हा लगेच हसायचे… आणि त्या रुसण्यातही प्रेमच(Marathi Nostalgic Songs) असायचे.
“खुसू खुसू, गाली हसू,
वरवर अपुले रुसू रुसू,
चल निघ, येथे नको बसू,
घर तर माझे तसू तसू.”
आणि शेवटी तर हा सगळा खट्याळपणा अगदी शिखरावर (Marathi Nostalgic Songs)पोहोचतो…
“कशी कशी, आज अशी,
गंमत ताईची खाशी!
आता कट्टी फू दादाशी,
तर मग गट्टी कोणाशी?”
हे गाणे पहिल्यांदा ऐकले तेव्हा त्यातील शब्दांपेक्षा त्याची ही निरागस गंमत मला भावली होती. पण त्यामागची माझी एक खास आठवण (Marathi Nostalgic Songs)आहे.
१९८७ साल.
भारतामध्ये क्रिकेटचा विश्वचषक आयोजित करण्यात आला होता. त्यानंतरच्या काळात ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या रेकॉर्डब्रेक लोकप्रिय मालिकांनी तर अक्षरशः संपूर्ण देशाला दूरदर्शनसमोर बसवून ठेवले. शहरांमध्येच नव्हे, तर खेडोपाडीही टीव्ही पोहोचू लागला(Marathi Nostalgic Songs) होता.
आपापल्या आर्थिक कुवतीनुसार कुणाकडे छोटा टीव्ही, कुणाकडे मोठा टीव्ही. रंगीत टीव्ही तर त्याकाळी फारच कमी घरांमध्ये दिसायचा.आमच्या घरीही ‘रामायण’च्या काळातच नेल्को कंपनीचा टीव्ही आला होता.आणि हो… तो टीव्ही घेण्याचा हट्ट माझाच होता!दादांना मी हट्ट करून टीव्ही घ्यायला लावला. तोही (Marathi Nostalgic Songs)हप्त्यावर.
आज मागे वळून पाहताना त्या टीव्हीची किंमत, त्यासाठी केलेला हट्ट, घरच्यांनी केलेली जुळवाजुळव आणि त्या छोट्याशा पडद्याभोवती जमणारे घर… सगळे डोळ्यांसमोर उभे (Marathi Nostalgic Songs)राहते.
असो…
या आठवणी अशाच असतात.
एकदा आल्या की येतच राहतात.
थांबतच नाहीत.
मराठी दूरदर्शनवर त्याकाळी अनेक सुंदर कार्यक्रम व्हायचे. या गाण्याची दूरदर्शनवरील पहिली आठवणही तशीच आहे. कार्यक्रमाचे नेमके नाव आता आठवत नाही. त्या वेळी हे गाणे अंजली मराठे आणि एका पुरुष गायकाने गायलेले मी ऐकले होते. अंजली मराठे या प्रसिद्ध गायिका अनुराधा मराठे यांच्या कन्या(Marathi Nostalgic Songs) आहेत.
गाणे पहिल्यांदा ऐकले आणि मनाला अगदी भिडले.
तेव्हा अर्थातच गाण्याचा इतिहास, त्याचा कवी, संगीतकार किंवा चित्रपट याबद्दल काही माहिती नव्हती. गाणे आवडले एवढेच.
पण या लेखमालेच्या निमित्ताने जुन्या गाण्यांविषयी माहिती घेताना या गाण्याची अधिक रंजक ओळख समोर आली. ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ हे गाणे ‘देवता’ या कृष्णधवल मराठी चित्रपटाशी जोडलेले आहे. चित्रपटातल्या पुरुष कलाकार (मला त्यांचे नाव माहिती नाही )यांच्यासोबत एका बालकलाकाराची उपस्थितीही या गाण्याला अधिक गोड(Marathi Nostalgic Songs) बनवते.
खरं तर गाण्याचा गाभाच आहे तो भावा-बहिणीच्या नात्याचा.
नात्यात कसलेही औपचारिकपण नाही. मोठेपणाचा आव नाही. फक्त चिडवाचिडवी, लाड, रुसवा आणि पुन्हा गट्टी.
“सांग तिकडच्या स्वारीला…”
किंवा,
“आणखी गंमत कोणाला?”
या ओळी ऐकताना आपल्याही बालपणातला एखादा भाऊ किंवा बहीण आठवतो.
माझ्या आयुष्यात सख्खी बहीण नाही. पण खरं सांगायचं तर, याची उणीव मला कधीच तितकीशी जाणवली नाही. आयुष्यात अनेकांनी बहिणीचे नाते दिले. वडिलांचे विद्यार्थी, माझ्या वर्गभगिनी, मावस-चुलत बहिणी… कितीतरी जणींनी अगदी सख्ख्या बहिणीसारखे प्रेम (Marathi Nostalgic Songs)दिले.
खरं तर ‘सख्खी’, ‘चुलत’, ‘मावस’ असे शब्द लावून नात्याची मोजदाद करणेही चुकीचेच वाटते.
बहीण म्हणजे बहीण.
नात्याला रक्ताचीच गरज असते असे कुठे आहे?
कधी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यात येते आणि नकळत एखादे नाते घेऊन येते. त्यात अपेक्षा नसतात, हिशेब नसतो. असते फक्त आपलेपणाची एक(Marathi Nostalgic Songs) उब.
म्हणूनच हे गाणे मला केवळ बालगीत म्हणून आवडत नाही. त्यात मला नात्यांचा एक सुंदर निरागसपणा दिसतो.
या गाण्याच्या मूळ ध्वनिमुद्रित आवृत्तीलाही आपला स्वतंत्र ठसा आहे. मूळ गायकांनी ते अतिशय धमाल आणि खट्याळ पद्धतीने सादर केले आहे. मात्र माझ्या मनात या गाण्याची जी प्रतिमा तयार झाली, ती नंतर ऐकलेल्या गायकांच्या आवाजातूनच अधिक घट्ट (Marathi Nostalgic Songs)बसली.
काही गाणी अशी असतात की त्यांची एक ‘मूळ’ आवृत्ती असते आणि आपली एक ‘आठवणीतील’ आवृत्ती.
माझ्यासाठी ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ हे त्यापैकीच एक.
गाणे ऐकताना आजही मला तो जुना दूरदर्शनचा पडदा आठवतो. घरातला तो नेल्कोचा टीव्ही आठवतो. रामायणच्या वेळची गर्दी आठवते. त्या काळात मनोरंजनाची साधने किती मर्यादित होती, पण त्या मर्यादित साधनांतून मिळणारा आनंद किती मोठा होता, हे (Marathi Nostalgic Songs)आठवते.
आज एका मोबाईलमध्ये हजारो गाणी आहेत. हवे ते गाणे एका क्षणात ऐकता येते. पण त्या काळात एखादे आवडते गाणे रेडिओवर किंवा दूरदर्शनवर लागण्याची वाट पाहण्यातही एक वेगळीच मजा (Marathi Nostalgic Songs)होती.
आणि म्हणूनच कदाचित त्या गाण्यांची आठवण इतकी घट्ट मनात साठून राहिली.
‘तुझ्या गळा, माझ्या गळा’ हे गाणे ऐकताना मला आजही त्या काळातला दादा दिसतो, ताई दिसते, त्यांची खोडकर भांडणे दिसतात आणि त्या भांडणाच्या शेवटी पुन्हा होणारी गट्टीही दिसते.
बालपण संपते.
घरं बदलतात.
माणसं मोठी होतात.
नातीही आपल्या आपल्या वाटेने पुढे जातात.
पण काही गाणी मात्र तिथेच थांबतात…
आपल्या बालपणाच्या दाराशी.
आपण कितीही मोठे झालो तरी ती गाणी लागली की मन पुन्हा एकदा तितकेच लहान होते.
आणि मग नकळत मनात येते…
“आता कट्टी फू दादाशी…
तर मग गट्टी कोणाशी?”
कदाचित यालाच म्हणतात…साठवणीतले (Marathi Nostalgic Songs)गाणे!
विवेक दिगंबरराव कुलकर्णी
