पिंपरी : नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर १२ ते २३ ऑगस्टदरम्यान १६व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘हॉकी महाराष्ट्र’ आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने होणाऱ्या या १२ दिवसांच्या स्पर्धेत देशभरातील ३० संघ सहभागी होणार आहेत.स्पर्धेची सांगता २३ ऑगस्ट रोजी ‘डिव्हिजन ए’च्या अंतिम सामन्याने होईल. यंदा पदोन्नती आणि रेलिगेशनची व्यवस्था असल्याने सामन्यांमध्ये अधिक चुरस पाहायला मिळणार आहे.
तीन विभागांत ३० संघ
स्पर्धेतील ३० संघांची ‘ए’, ‘बी’ आणि ‘सी’ अशा तीन विभागांत विभागणी करण्यात आली आहे. ‘डिव्हिजन ए’मध्ये १२ संघांचा समावेश असून, त्यांची चार पूलमध्ये विभागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्राचा समावेश पूल ‘सी’मध्ये उत्तर प्रदेश आणि मणिपूरसोबत आहे.
प्रत्येक पूलमधील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. २० ऑगस्टला उपांत्यपूर्व, २१ ऑगस्टला उपांत्य आणि २३ ऑगस्टला अंतिम सामना होईल. ‘डिव्हिजन ए’मधील तळाचे दोन संघ ‘डिव्हिजन बी’मध्ये घसरतील.
‘डिव्हिजन बी’मध्ये १०, तर ‘डिव्हिजन सी’मध्ये आठ संघ असतील. ‘बी’मधील अव्वल दोन संघांना ‘ए’मध्ये बढती मिळेल, तर तळाचे दोन संघ ‘सी’मध्ये जातील. ‘सी’मधील अव्वल दोन संघांना ‘बी’मध्ये प्रवेश मिळेल.
सर्व सामने लीग पद्धतीने खेळवले जातील. विजयासाठी तीन, तर बरोबरीसाठी एक गुण दिला जाईल. ‘डिव्हिजन ए’मधील निकाल अनिवार्य असलेल्या सामन्यांचा निर्णय एफआयएचच्या नियमानुसार शूटआउटद्वारे केला जाईल.
युवा खेळाडूंना मोठे व्यासपीठ
“इतक्या मोठ्या दर्जाच्या स्पर्धेचे यजमानपद भूषवणे हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा विषय आहे. युवा खेळाडूंना सर्वोत्तम व्यासपीठ आणि सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे,” असे ‘हॉकी महाराष्ट्र’चे अध्यक्ष व आयोजन समितीचे प्रमुख कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.
सरचिटणीस मनीष आनंद यांनी ही स्पर्धा भावी आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याचे सांगितले. आयोजन सचिव मनोज भोरे यांनीही या स्पर्धेतून नवीन प्रतिभावान खेळाडू पुढे येतील, असा विश्वास व्यक्त केला.
‘हॉकी महाराष्ट्र’ची राष्ट्रीय महासंघासोबतच्या १६ वर्षांच्या सहकार्यातील ही १२ वी राष्ट्रीय स्पर्धा असून, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर होणारी ही तिसरी राष्ट्रीय स्पर्धा आहे.
आयोजन समितीचे अध्यक्ष आणि महापौर रवी लांडगे यांनी पिंपरी-चिंचवडसह पुण्यातील क्रीडाप्रेमींनी स्टेडियमवर उपस्थित राहून युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे.
