दिवाण्या(पोळा स्पेशल )
आताच्या या यांत्रिक युगात दिवसेंदिवस पशुधनाचे महत्त्व कमी होऊ लागले असले, तरी काही छोटे-मध्यम शेतकरी आणि काही हौशी शेतकरी मंडळी अजूनही पशुधन राखून आहेत. आणि त्यांना त्याचा अभिमानही आहे.
आज श्रावण अमावस्या.
आजचा दिवस म्हणजे बैलपोळा. बैलांचा सण…
वर्षभर शेतात राबणाऱ्या, उन्हातान्हात अंगाची कातडी सोलून घेणाऱ्या, चिखलात पाय रोवून मालकाच्या संसाराला हातभार लावणाऱ्या बैलांचा आजचा दिवस.
आणि सगळ्यात महत्त्वाचं…
आज शेतकरी आपल्या बैलांच्या डोळ्यांत डोळे घालून मनातल्या मनात म्हणतो—
“तुम्ही होता म्हणून माझा संसार उभा राहिला…”
वर्षभर शेतात राबणाऱ्या त्या मुक्या जीवांसाठी आजचा दिवस म्हणजे आपल्या संस्कृतीतील कृतज्ञतेचा दिवस.
मालकाच्या सुख-दुःखातले हे कायमचे मूक सोबती. म्हणून पोळा केवळ एक सण नाही, तर कृतज्ञतेचा दिवस आहे.
अशाच एका गावातली ही कथा आहे… सत्य घटनेवर आधारित.
—
शिरपा श्रीपती पहाटेच उठला.
अजून झुंजूमुंजू व्हायचं होतं. आभाळाच्या कडेवर उजाडण्याची चाहूलही लागली नव्हती.
तो तसाच मागच्या गोठ्याकडे गेला.
रात्री झोपताना अप्पा म्हणाले होते,
“शिरपा, उठशील तवा दिवाण्याकडं बघ बरं का…”
शिरपानं गोठ्यात डोकावलं.
दिवाण्या खाली मान पसरून बसला होता. वय झालं होतं… काबाडकष्ट उपसले होते.
“काय रं दिवाण्या… उठ की! आज तुझा दिवस हाय!”
शिरपानं हळूच मायेनं त्याच्या पाठीवर हात फिरवला.
पण दिवाण्यानं मानही वर केली नाही.
शिरपाच्या मनात चर्र झालं.
आज बैलपोळा होता.
आणि दिवाण्या असा निस्तेज?
—
शिरपाच्या दावणीला एक दुभती गीर गाय, तिची कालवड, दोन बैल आणि घरचा वयस्कर दिवाण्या असा बारदाना होता.
दुष्काळाचं सावट होतं. चाऱ्याचा प्रश्न होता. घरखर्च ताणला होता.
पण अप्पांचं एक सांगणं होतं.
“एक वेळ दिवाळी नको करू… पण पोळ्याला आपल्या बैलांना काही कमी पडता कामा नये!”
शिरपाही अप्पांची ही धडपड लहानपणापासून पाहत आला होता.
परिस्थिती कितीही बिकट असो, अप्पा पोळा साजरा करायचेच.
त्या दिवशी अप्पांच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक असायची.
जिजीच्या चेहऱ्यावरही समाधान ओसंडून वाहायचं.
घर गरीब नव्हतं, श्रीमंतही नव्हतं.
खाऊन-पिऊन सुखी. समाधानात आनंदी.
तीन वर्षांपूर्वी शिरपाचं लग्न झालं होतं. बायकोही गुणाची आणि कष्टाळू मिळाली होती.
अप्पांना आता कष्ट होत नसत.
म्हणून शिरपानं त्यांना सक्त ताकीदच दिली होती.
“आता तुम्ही अन् दिवाण्या दोघांनी बी आराम करायचा. कामाला हात लावायचा न्हाई. आयुष्यभर राबलात… आता किती राबणार?”
अप्पा हसायचे.
“अरे, काम नसलं की अंग दुखतं रं!”
“म्हातारपणी अंग दुखतं ते काम न केल्यामुळं!”
असं म्हणताच शिरपा त्यांना थांबवायचा.
एकादशी आली की अप्पांना पंढरीच्या वारीला पाठवायची व्यवस्था शिरपा स्वतः करायचा.
विठ्ठलावर अपार श्रद्धा.
घरात धार्मिक वातावरण. पापभीरू म्हणाना…
आणि त्या सगळ्या संसारात दिवाण्या म्हणजे अप्पांचा आणखी एक जीव.
—
दिवाण्या…
घरच्या हरणीचा गोऱ्हा. पाडसच जणू…
तेरा-चौदा वर्षांपूर्वी हरणीनं त्याला जन्म दिला होता.
काय देखणं वासरू होतं! अप्पांनीही त्याला पोटच्या पोरासारखं सांभाळलं होतं. म्हणून की काय, दिवाण्या शरीरानं नंदीबैलासारखा धष्टपुष्ट तर होताच; परंतु स्वभावानं अत्यंत शांत होता.
शेतावर कामाला आलेले मजूर वाऱ्यावावधानाला, पावसाला आडोसा म्हणून दिवाण्याखाली बसायचे.
हे वासरू पहिल्यापासूनच अप्पांच्या मागं मागं फिरायचं.
अप्पा शेतात गेले की दिवाण्या मागं.
गावात गेले तरी मागं.
अप्पांनी त्याला कधी कासरा लावला नाही की दावं बांधलं नाही.
तो कायम मोकळा.
अप्पांची हाक हाच त्याचा कासरा…
गावातून शेताकडं जाताना नदी लागायची. नदीत पाणी दिसलं की दिवाण्याच्या अंगात वार शिरायचं!
तो काही पाण्यातून बाहेर यायचा नाही.
अप्पा ओरडायचे,
“दिवाण्या… ए दिवाण्या! चल रं बाबा! लय काम हायत!”
दिवाण्या कान टवकारायचा.
अप्पांचा आवाज ऐकला की नाकात वार शिरल्यासारखा हुंदडत परत यायचा आणि अप्पांच्या मागं निमूट चालायला लागायचा.
अप्पांचा त्याच्यावर फार जीव.
स्वतः दोन घास कमी खातील; पण दिवाण्याच्या तोंडचा घास कमी पडू देणार नाहीत.
गावातले लोक त्याला पाहून तोंडात बोट घालायचे.
“असा बैल आपल्या दावणीला असावा!”
काही जण मात्र अप्पांची टिंगल करायचे.
“खायला नाही दाना अन् पाळला म्हण दिवाणा!”
अप्पा हसायचे.
काही बोलायचे नाहीत.
दिवाण्या त्यांना माणसांपेक्षा जास्त कळत होता.
—
दिवाण्याला जेव्हा पेटवलं, तेव्हा त्याच्या जोडीला गावातलाच एक गोऱ्हा अप्पांनी विकत घेतला. तोही दिवाण्याचा भाऊच… दोघांचा बाप एकच.
नाव ठेवलं—हौशा.
“हौसेनं बारदाना वाढवलाय म्हणून हौशा!”
ही जोडी अशी तयार झाली की गावभर तिची चर्चा व्हायची.
अप्पांच्या उमेदीच्या काळात या दोघांनी अशी साथ दिली, अशी राबराब राबली की अप्पांनी अडीच एकराची जमीन पाच एकरांवर नेली.
अप्पांना घरधनीणही तोलामोलाची मिळाली होती.
दोघांनी मिळून संसार उभा केला.
त्यात एकुलत्या एक शिरपाची भर पडली.
आणखी काय हवं होतं?
अप्पा म्हणायचे,
“विठ्ठलानं पदरात घातलंय सगळं…”
—
पण शेतकऱ्याच्या नशिबाला अस्मानी-सुलतानी पाचवीलाच पुजलेली.
एके वर्षी असंच झालं.
आभाळ फुटलं.
पाऊस थांबेना.
नदीला महापूर आला.
शेतात पाणीच पाणी.
गावाशी संपर्क तुटला.
त्या दिवशी अप्पा शेतावर एकटेच होते.
सोबत हौशा आणि दिवाण्या.
दोन दिवस सतत पाऊस.
अप्पा कसंबसं एका झाडावर चढून बसले होते.
बैलांना त्यांनी मोकळं सोडलं.
सगळेच दोन दिवसांपासून उपाशी होते. कुठून, कशीच मदत मिळणार नव्हती.
“जा रे बाबा… तुमचा जीव वाचवा!”
पण हौशा आणि दिवाण्या?
दोघंही अप्पांना सोडायला तयार नव्हते.
अप्पा पुन्हा ओरडले,
“जा रे! जा! गावाकडं जा!”
पण त्यांना मालकाला सोडून जायचं नव्हतं.
ज्यांनी आपल्याला एवढा जीव लावला आहे, त्यांना असं संकटात सोडायचं नाही—इतकंच त्यांना माहीत होतं.
शेवटी दिवाण्यानं ठरवलं.
कसंही करून गावात जायचं.
तो छातीएवढ्या पाण्यात उतरला.
पावसाचा मारा.
पाण्याचा प्रचंड वेग.
समोर नदी.
गावातही नदी पात्र सोडून उंबरे शिवू लागली होती. लोक भीतीने छतावर जाऊन बसले होते.
पण दिवाण्या हट्टाला पेटला होता.
तो पोहत राहिला.
शेवटी कसाबसा गावाच्या वेशीवर पोहोचला.
गावकरी घरांच्या छपरावर बसले होते.
सगळ्यांच्या नजरा त्या एका बैलाकडे लागल्या.
“अरे! हा तर अप्पाचा दिवाण्या दिसतोय?”
“एकटाच कसा?”
“अप्पा दिसत नाहीत?”
प्रश्नांची गर्दी झाली.
पण दिवाण्या कोणाला कसं सांगणार?
तो सरळ घराकडे धावत गेला.
दारात पोहोचला आणि मोठ्यानं हंबरला.
जिजी धावतच बाहेर आली.
दिवाण्याला एकट्याला पाहून तिच्या काळजात धस्स झालं.
“दिवाण्या… धनी कुठंयत?”
दिवाण्या अस्वस्थ.
मुका बिचारा सांगू शकत नव्हता.
चाऱ्याला तोंड लावलं नाही.
तो सारखा मागं वळून पाहत होता.
जिजीच्या लक्षात आलं.
हा काहीतरी सांगतोय. सारखा मागं वळून पाहतोय…
जिजीच्या डोळ्यांत पाणी आलं.
मग अचानक तिच्या लक्षात आलं—
दोन दिवसांपासून अप्पांनी काही खाल्लं नसेल.
तिनं लगबगीनं भाकर, कोरड्यास, कांदा-ठेचा, थोडं मीठ, खार आणि गुळाचा खडा बांधला.
दिवाण्याच्या शिंगाला तो गठ्ठा बांधला.
दिवाण्या क्षणभरही थांबला नाही.
पुन्हा माघारी वाऱ्यासारखा फिरला… पाण्यात उतरला.
जिजी दारात उभी राहून त्याच्याकडे पाहत राहिली.
तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. अश्रूंमुळे समोरचं सगळं धूसर दिसू लागलं.
आणि ओठांतून एकच शब्द बाहेर पडला—
“दिवाण्या…”
—
दोन दिवसांनी पाणी ओसरलं.
अप्पा हौशा आणि दिवाण्याला घेऊन गावाच्या वेशीवर आले.
गावकरी धावत आले.
लोकांच्या डोळ्यांत कौतुक होतं.
आदर होता.
आणि जिजी?
ती दिवाण्याच्या आणि हौश्याच्या कपाळावरून हात फिरवत रडत होती.
दोनच दिवसांनी पोळा होता; पण त्याच दिवशी खरं तर पोळा साजरा झाला होता. अश्रूंनी दोघांचं स्नान झालं होतं.
कारण पोळा म्हणजे फक्त शिंगांना रंग लावणं नव्हतं.
पोळा म्हणजे—
जीवाला जीव देणाऱ्या नात्याची पूजा.
—
काळ पुढं सरकला.
हौशा चार वर्षांपूर्वी लंपीच्या आजारानं गेला.
दिवाण्या एकटा पडला.
अप्पांचंही वय झालं होतं.
दिवाण्याला आता कष्ट होत नव्हते.
म्हणून शिरपानं ठरवलं—
“आता दिवाण्यालाही आराम.”
काम नाही.
फक्त खायचं, प्यायचं आणि जगायचं.
—
आज पुन्हा पोळा आला.
शिरपा आणि त्याची बायको पहाटेपासून कामाला लागले.
दिवाण्याला अंघोळ घालायची.
शिंगांना रंग लावायचा.
नवी झूल चढवायची.
गळ्यात घुंगरमाळा बांधायची.
गुळाची पोळी करायची.
सगळं ठरलेलं.
पण…
दिवाण्या उठत नव्हता.
शिरपा पुन्हा गोठ्यात गेला.
“दिवाण्या…”
काही हालचाल नाही.
“ए दिवाण्या… उठ रं!”
त्याने पाठीवर हात ठेवला.
शरीर थंड पडलेलं.
शिरपाचा हात तिथंच थांबला.
“दिवाण्या…”
आवाज भरून आला.
त्याच्या डोळ्यांसमोर अचानक ते महापुराचं दृश्य उभं राहिलं.
छातीएवढं पाणी…
धो-धो पाऊस…
आणि त्या पाण्यातून पोहत जाणारा दिवाण्या…
शिंगाला बांधलेली भाकर…
स्वतः दोन दिवस उपाशी राहून.
शिरपा खाली बसला.
दिवाण्याचं डोकं मांडीवर घेतलं.
“अरे दिवाण्या… आज तुझा पोळा हाय रे…”
त्याचा गळा दाटून आला.
“उठ की रं… आज तुला सजवायचं हाय…”
जिजीही आली.
दिवाण्याला पाहिलं आणि तिच्या तोंडून हुंदका फुटला.
अप्पा मात्र दाराशी शांत उभे होते.
डोळ्यांत पाणी.
ते हळूहळू पुढे आले.
दिवाण्याच्या कपाळावर हात ठेवला.
क्षणभर डोळे मिटले.
आणि पुटपुटले,
“विठ्ठला… आयुष्यभर माझ्यासाठी राबला रं हा… शेवटी पोळ्याच्या दिवशीच माझ्या हातातून गेला…”
शिरपानं अप्पांकडे पाहिलं.
दोघांच्या डोळ्यांत पाणी होतं.
आज घरात पोळ्याची लगबग होती.
पण गोठ्यात मात्र शांतता होती.
शिरपानं त्याच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावला.
आणि डोळे पुसत म्हणाला,
“दिवाण्या…
माझा जीव असेपर्यंत मी तुला विसरणार नाही. दर पोळ्याला तुझी आठवण काढीन आणि तुझी पूजा घालत जाईन.”
अप्पांनी त्याच्या कपाळावर शेवटचं चुंबन घेतलं.
बाहेर पोळा साजरा होत होता.
पण शिरपाच्या घरात आज एक वेगळाच पोळा झाला होता—
ज्याने आयुष्यभर दिलं,
त्याच्यापुढं माणूस आज नतमस्तक झाला होता.
गावातही ही बातमी पसरली…
दिवाण्या गेला…
सगळं गाव पोळा सोडून अप्पांच्या गोठ्यात जमलं.
आणि सगळ्यांनी ठरवलं की दिवाण्याची समाधी गावच्या वेशीजवळ बांधायची आणि दर पोळ्याला त्या समाधीला वंदन करूनच घरी पोळ्याची पूजा करायची.
हीच त्याला श्रद्धांजली.
पोळ्याच्या सणाचाही असाच संदेश असावा…
काही नाती दावणीला बांधलेली नसतात,
तर ती थेट हृदयाच्या खुंट्याला बांधलेली असतात.
— अतुल काटेकर
