(प्रतिनिधी ):घाटमाथ्यासह पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी शुक्रवार (२४ जुलै) रोजी सकाळी ९ वाजल्यापासून विद्युतगृहामार्फत पवना नदीपात्रात ८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाच्या पवना धरण प्रकल्प, पवनानगर प्रशासनाने दिली (Pawna Dam Updates) आहे.
प्रशासनाच्या माहितीनुसार, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि घाटमाथ्यावर सातत्याने पाऊस सुरू असल्याने धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग लक्षात घेऊन नदीपात्रातील विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवून ५,००० क्युसेकपर्यंत नेण्याची शक्यता आहे. विसर्ग वाढविण्यापूर्वी त्याबाबतची माहिती स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले (Pawna Dam Updates)आहे.
सततच्या पावसामुळे पवना नदी तसेच परिसरातील ओढे-नाले आणि नदीपात्रातील पाणीपातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या सर्व ग्रामस्थ, नागरिक, शेतकरी आणि लाभधारकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले (Pawna Dam Updates) आहे.
तसेच नदीपात्रातील साहित्य, शेतीची अवजारे, कृषी पंप तसेच जनावरे तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवावीत. नदीपात्रात जाणे टाळावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पूर नियंत्रण कक्ष, पवना धरण प्रकल्प, पवनानगर यांनी केले आहे. याशिवाय तालुका, जिल्हा आणि शहर प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करण्याचेही नागरिकांना आवाहन करण्यात आले (Pawna Dam Updates) आहे.
