रसिकजनहो… आदाब! 🙏🙏
साठवणीतले गाणे : पुष्प सातवे
सावन के सुहाने मौसम में…
प्रेम जेव्हा शब्दांमध्ये उतरते आणि गाणं अमर (Sawan Ke Suhane)होतं!
हो 😄
कसे आहात?
पावसाचे दिवस सुरू आहेत. बाहेर कधी रिमझिम, तर कधी मुसळधार पाऊस… आणि आत मनात आठवणींची सर. अशा वातावरणात काही गाणी नकळत ओठांवर येतात. ती आपण लावून ऐकत नाही… ती स्वतःच मनात वाजायला लागतात.
‘साठवणीतले गाणे’ या सदराचे हे सातवे पुष्प तुमच्यासमोर ठेवताना मनात एक वेगळीच भावना दाटून आली आहे.
मागील काही भागांमध्ये तुम्ही गझलसम्राटांच्या आवाजातील गाणी अनुभवली. त्यामुळे काही रसिकांच्या मनात कदाचित प्रश्न निर्माण झाला असेल…
“हे सदर फक्त गझलांवरच आहे का?”
नाही… अजिबात नाही!
हे सदर म्हणजे संगीताच्या अथांग सागरातून वेचलेले काही अमूल्य मोती आहेत. इथे गझल असेल, भावगीत असेल, चित्रपटगीत असेल, भक्तिगीत असेल, विरह असेल, आनंद असेल, जीवन असेल… आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे माणसाच्या मनाला स्पर्श करणारी भावना असेल.
कारण…
गाणी आपण कानांनी ऐकतो खरी… पण ती कायमची साठवली जातात ती हृदयात.
आज आपण भेटणार आहोत अशाच एका गीताला… जे प्रेमाचं वर्णन करत नाही, तर प्रेमात पडलेल्या मनाचं चित्र रंगवतं.
रेशमी आवाजाचे धनी, गझलनवाज पंकज उधास…
अहाहा…
किती विलक्षण आवाज होता त्यांचा!
त्यांचा आवाज ऐकताना असं वाटतं… जणू एखाद्याने मखमली शालीत शब्द अलगद गुंडाळून आपल्या हृदयावर ठेवले आहेत.
या गीताचे शब्द आहेत डॉ. हसरत जयपुरी यांचे आणि या सुरेल रचनेला संगीत दिले आहे उस्ताद अहमद हुसेन आणि उस्ताद मोहम्मद हुसेन या गुणी संगीतकार जोडीने. या गीताच्या लोकप्रिय सादरीकरणाला पंकज उधास यांच्या मखमली आवाजाची लाभलेली साथ त्याला अधिकच संस्मरणीय बनवते.
यापेक्षा सुंदर शब्द, सूर आणि आवाजाचा संगम अजून काय असू शकतो?
असं म्हणतात…
प्रेम ही माणसाच्या आयुष्यातील सर्वांत सुंदर चूक असते.
ज्यात पडताना कोणी विचार करत नाही…
आणि बाहेर पडावंसंही वाटत नाही!
तारुण्य आणि प्रेम…
हे दोन शब्द जणू एकमेकांसाठीच जन्माला आले आहेत.
जो कधी प्रेमात पडला नाही…
त्याने आयुष्यातला एक सुंदर ऋतू कदाचित अनुभवलेलाच नाही.
या गीतातील नायकही तसाच…
तो एका रूपवान तरुणीच्या प्रेमात आकंठ बुडाला आहे.
पण गंमत अशी की…
तो तिच्या सौंदर्याचं केवळ वर्णन करत नाही…
तो स्वतःच्या नजरेतून तिच्यावर प्रेम कसं उमलतंय, ते सांगतो.
तिच्या कपाळावर त्याला ताऱ्यांची चमक दिसते…
केसांमध्ये बंगालची जादू…
गालांवर काश्मीरचा गुलाबी स्पर्श…
आणि तिच्या डोळ्यांत…
काजळ नव्हे…
तर स्वतः वीज उतरली आहे, असं त्याला वाटतं.
हे वर्णन त्या तरुणीचं कमी…
आणि प्रेमात पडलेल्या मनाचं जास्त आहे.
प्रेमात खरंच असंच होतं ना?
समोरची व्यक्ती बदलत नाही…
बदलते ती आपली नजर.
आणि प्रेमाची नजर…
नेहमीच जगातलं सर्वांत सुंदर चित्र पाहत असते.
या गीतातील प्रत्येक कडवं म्हणजे सौंदर्याचं चित्र…
प्रत्येक ओळ म्हणजे प्रेमाचं स्पंदन…
आणि प्रत्येक सूर म्हणजे हृदयाची धडधड.
माझ्या मनाला मात्र कायम भुरळ घालणारी ओळ एकच…
“अंदाज़ है उसमें गीतों की…
आवाज़ है उसकी ग़ज़ल जैसी…”
वा…
एखाद्या स्त्रीच्या सौंदर्याचं, तिच्या व्यक्तिमत्त्वाचं, तिच्या अस्तित्वाचं याहून सुंदर वर्णन शब्दांत होऊ शकतं का?
खरं सांगू?
मीसुद्धा प्रेमात पडलो होतो…
एकदा?
नाही…
अनेकदा! 😄
कधी एखाद्या चेहऱ्याच्या निरागस हसण्यात…
कधी एखाद्या पावसाळी संध्याकाळीत…
कधी एखाद्या पुस्तकात…
आणि अनेकदा…
अशाच एखाद्या अजरामर गाण्यात.
आजही हे गीत ऐकलं की मन काही क्षणांसाठी पुन्हा तरुण होतं.
आठवणींना पुन्हा पालवी फुटते.
ज्यांच्यावर कधीतरी निरागसपणे प्रेम केलं होतं…
त्यांचे चेहरे धूसर का होईना…
पण मनाच्या पडद्यावर पुन्हा एकदा उमटतात.
काही गाणी संपतात…
काही गाणी विसरली जातात…
पण काही गाणी…
आपल्यातच राहतात.
ती आपला श्वास बनतात.
आपल्या आठवणी बनतात.
आणि नकळत…
आपल्या आयुष्याचाच एक छोटासा भाग बनून जातात.
‘सावन के सुहाने मौसम में…’ हे असंच एक गीत आहे.
माझ्यासाठी हे फक्त गाणं नाही…
तर प्रेम, सौंदर्य आणि आठवणींचा एक सुगंधी पाऊस आहे.
गेल्या दोन दिवसांपासून तब्येत थोडीशी साथ देत नाही. त्यामुळे आज शब्दही थोडे थकले आहेत.
पण मन मात्र अजूनही हेच गुणगुणत आहे…
कदाचित म्हणूनच…
आज इथेच थांबतो.
बाकी…
या गीताबद्दल तुम्ही काय अनुभवलंत, हे जरूर सांगा.
कारण…
गाणी गायक गातात…
पण त्यांना अमर करतात ते रसिक!
पुन्हा भेटू…
‘साठवणीतले गाणे’च्या आणखी एका सुरेल, भावस्पर्शी आणि आठवणींनी भरलेल्या पुष्पासह.
तोपर्यंत…
मनातलं प्रेम जपा…
आठवणी जपा…
आणि संगीतावर मनापासून प्रेम करत राहा…
आदाब! 🙏🙏
गीताविषयी
गीत : सावन के सुहाने मौसम में
गीतकार : डॉ. हसरत जयपुरी
संगीतकार : उस्ताद अहमद हुसेन – उस्ताद मोहम्मद हुसेन
लोकप्रिय गायक : पंकज उधास
विवेक कुलकर्णी
