(पिंपरी ):पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागातील सहशहर अभियंता मनोज मोतीलाल सेठिया यांची ‘शहर अभियंता’ या पदावर पदोन्नती करण्यात आली आहे. सेवाज्येष्ठतेनुसार निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात ही नियुक्ती करण्यात आली असून, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत.
महापालिकेतील शहर अभियंता हे पद २८ फेब्रुवारी २०२६ पासून रिक्त होते. या पार्श्वभूमीवर १८ जून २०२६ रोजी झालेल्या पदोन्नती समितीच्या बैठकीत मनोज सेठिया यांच्या शैक्षणिक अर्हता, सेवाज्येष्ठता, अनुभव, गोपनीय अहवाल तसेच शिस्तभंगविषयक बाबींची पडताळणी करण्यात आली.
पदोन्नती समितीच्या शिफारशीनुसार तसेच महापालिका सभेच्या २७ जानेवारी २०२६ रोजीच्या ठराव क्रमांक ४४ अन्वये सेठिया यांच्या पदोन्नतीला मान्यता देण्यात आली. त्यानुसार त्यांची शहर अभियंता पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, ही पदोन्नती सर्वोच्च न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात प्रलंबित असलेल्या याचिकांवरील अंतिम निर्णयाच्या अधीन राहणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
मनोज सेठिया यांच्यावर शहर अभियंता म्हणून नवीन जबाबदारी सोपविण्यात आल्याने महापालिकेच्या स्थापत्य विभागाच्या कामकाजाला अधिक गती आणि सुसूत्रता मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच शहरातील विविध विकासकामांच्या तांत्रिक नियोजन आणि अंमलबजावणीलाही यामुळे चालना मिळण्याची शक्यता आहे.
