(पिंपरी,प्रतिनिधी ता. २) : जागतिक स्तनपान सप्ताह (१ ते ७ ऑगस्ट) निमित्त इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या वतीने समाजोपयोगी जनजागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मातांमध्ये स्तनपानाविषयी योग्य माहिती पोहोचविण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी दोन महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले.
स्तनपान सप्ताहानिमित्त क्लबच्या सदस्या डॉ. स्वाती देशमुख आणि डॉ. प्रेरणा बेरी यांनी स्तनपानाचे महत्त्व सांगणारा जनजागृती उपक्रम राबविला. “आईचे दूध हे बाळासाठी निसर्गाने दिलेले अमृत असून त्याला कोणताही पर्याय नाही,” हा संदेश अधिकाधिक गर्भवती माता, नवमाता आणि त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने माहितीपर व्हिडिओ तयार करून प्रसारित करण्यात आला. बाळाच्या निरोगी वाढीसाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि आई-बाळातील भावनिक नाते दृढ करण्यासाठी स्तनपानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
याचबरोबर इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईड आणि SMILE संस्थेच्या संयुक्त विद्यमाने संत तुकाराम नगर येथील दीनदयाळ विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी “अंमली पदार्थ व व्यसनमुक्ती जनजागृती कार्यशाळेचे” आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेत हर्षल जोशी यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या व्यसनापासून दूर राहण्यासाठी आवश्यक उपाययोजना, व्यसनाची सुरुवातीची लक्षणे ओळखण्याचे महत्त्व तसेच योग्य जीवनमूल्यांचा स्वीकार याविषयी मार्गदर्शन केले. दारू, तंबाखू आणि अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम प्रभावीपणे समजावून सांगण्यासाठी माहितीपटाचेही प्रदर्शन करण्यात आले.

ही कार्यशाळा नियोजित चार ते पाच जनजागृती सत्रांच्या मालिकेतील पहिला उपक्रम असून विद्यार्थ्यांमध्ये सातत्याने जागरूकता निर्माण करणे आणि त्यांना निरोगी, व्यसनमुक्त जीवनशैलीकडे प्रेरित करणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत चर्चेत सक्रियपणे भाग घेतल्याने संपूर्ण कार्यशाळा ज्ञानवर्धक, संवादात्मक आणि प्रभावी ठरली.
समाजात आरोग्य, जनजागृती आणि सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडविण्याच्या उद्देशाने इनर व्हील क्लब ऑफ निगडी प्राईड सातत्याने विविध उपक्रम राबवत असून या दोन्ही उपक्रमांचेही नागरिकांनी कौतुक केले.
